हिंगोली: राज्य शासनाने राज्यात होणारी शासकीय नोकर भरती खाजगी पध्दतीने भरण्याचे परिपत्रक काढल्याने संपूर्ण राज्यात सुशिक्षित बेरोजगारात प्रचंड नाराजीचा सूर पसरला आहे. राज्य शासनाने होऊ घातलेला शासकीय नोकरीचे खाजगीकरण करण्याचा घाट तात्काळ रद्द करावा यासाठी सुशिक्षित बेरोजगार कृती समिती, आझाद समाज पार्टी, शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी व समविचारी संघटनांच्या वतीने मंगळवारी (दि. ३) सेनगाव तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
राज्य शासनाकडून होत असलेली सुशिक्षित बेरोजगाराची मुस्कटदाबी तात्काळ थांबवावी व शासकीय नोकरीचे खाजगी कंपनीद्वारे भरती करण्याचा जीआर तात्काळ रद्द करावा. केजी टू पीजीपर्यंत सर्वांना मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे. सरळ सेवा परीक्षासाठी विद्यार्थ्यांना एसटी व रेल्वे प्रवास मोफत करावा. सरळ सेवा परीक्षेसाठी आकारले जाणारे अवाजवी शुल्क बंद करून सर्वांना सरसकट १०० रुपये शुल्क आकारले गेले पाहिजे आदी मागण्यांसाठी सेनगाव शहरातील मुख्य रस्त्याने निषेध मोर्चा तहसील कार्यालयावर काढला. आंदोलकर्त्यांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांना आपल्या मागण्याचे निवेदन देवुन जीआरची होळी केली.
मोर्चात आझाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव ॲड. रावण धाबे, सुशिक्षित बेरोजगार कृती समितीचे युवराज ठोके, मनिषा खिल्लारे, प्रकाश थोरात, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, काँग्रेसचे प्रभाकर जिरवणकर, बंडू नरवाडे, सचिन भालेराव, आसपा महिला आघाडीच्या आरोही जाधव, गजानन कावरखे, मुनीर पठाण, मानवी हक्क अभियानच्या महिला जिल्हाध्यक्ष राधिका चिंचोलीकर, रामदास सोनवणे, मानवी हक्क अभियानाचे मराठवाडा प्रमुख केशव अवचार, संदीप भूक्तर, अक्षय इंगोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख, आदींचा सहभाग होता. पोलीस निरीक्षक रंजीत भोईटे, शहर बीट अंमलदार सुभाष चव्हाण यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.