वटकळी येथील आदिवासी समाजाच्या स्मशानभूमी बाबत आझाद समाज पार्टीचे निवेदन
हिंगोली: सेनगाव तालुक्यातील मौजे वटकळी येथील आदिवासी समाजाच्या स्मशानभूमी बाबत आझाद समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक, हिंगोली यांना निवेदन देण्यात आले. वटकळी येथे आदिवासी समाजाच्या पूर्वापार चालत आलेल्या स्मशानभूमीवर ग्रामपंचायतने बेकायदेशीर ठराव घेऊन हक्क मिळविला आहे.
याबाबत ग्रामपंचायतने घेतलेल्या ठरावानुसार आदिवासी समाजाच्या ताब्यात असलेली स्मशानभूमीची जागा कोणत्याही एका विशिष्ट समाजाला न देता ग्रामपंचायतीचे नावे करण्यात यावी असा ठराव घेण्यात आला आहे. या ठारवामुळे आदिवासी समाजाची स्मशानभूमी नाहीशी झाली आहे. आदिवासी समाजाने सरपंच आणि ग्रामसेवक यांना अर्ज विनंती केल्या होत्या, परंतु कोणीही दाखल घेतली नसल्याने आज जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनानुसार आदिवासी समाजाची स्मशानभूमीची जागा त्यांचे ताब्यात द्यावी किंवा आदिवासी समाजासाठी पर्यायी स्मशानभूमी देण्यात यावी, आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीची जागा केवळ आदिवासी समाजासाठीच राखीव ठेवून त्या ठिकाणी आदिवासी समाजासाठी सामाजिक सभागृह उभारण्यात यावे आणि आदिवासी समाजाची स्मशानभूमी ग्रामपंचायतच्या नावे करण्यासाठी घेण्यात आलेला ठराव रद्द करून, ठराव घेणाऱ्यांवर अनुसूचित जाती जमाती कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली.
या निवेदनावर आझाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव रावण धाबे, आदिवासी पँथरचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत बोडखे, जिल्हाध्यक्ष सुनील बगाटे, रामू पुंडलिक डाखोरे, राजू परसराम अंभोरे, माधव शुक्राव डाखोरे, राजू शेषराव डाखोरे, बाबुराव नारायण डाखोरे, सोपान दत्तराव डाखोरे, गजानन परसराम अंभोरे, जगन माधव लेकुरवाळे, तालुकाध्यक्ष नितीन शिखरे, सेनगावचे तालुकाध्यक्ष अमोल गायकवाड यांच्या स्वाक्षरी आहेत.