समाज मंदिराच्या निळ्या रंगावर मारला पांढरा रंग: अनुसूचित जातीचे समाज मंदिर सवर्ण समाजाने घेतले ताब्यात

औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरखेडा येथील घटना

 अनुसुचित जातीच्या समाज मंदिराच्या निळ्या रंगावर पांढरा रंग लावताना महीला.

हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरखेडा येथे दलित वस्ती योजनेत मंजूर झालेल्या समाज मंदिराचा गेल्या अनेक वर्षांपासून गावातील सवर्ण समाजाने ताबा घेऊन त्याचा वापर सुरू केला होता. बौद्ध समाजाने याबाबत तीव्र आक्षेप घेऊन १५ दिवसांपूर्वी या समाज मंदिराचा कसाबसा ताबा घेतला. परंतु त्यानंतर आज १ मे २०२३ रोजी गावातील सवर्ण समाजाच्या काही महिलांनी या समाज मंदिराचा पुन्हा ताबा घेऊन समाज मंदिराला असलेला निळा रंग पुसून काढत त्यावर पांढरा रंग मारला आणि समाज मंदिराचा ताबा घेतल्याची घटना घडली. या घटनेमुळे जिल्हाभरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरखेडा येथे दलित वस्ती विकास योजनेमधून समाज मंदिर बांधण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून या समाज मंदिराचा ताबा गावातील सवर्ण समाजाने घेतला होता. या समाज मंदिराला लागूनच एक मंदिर आहे. त्या मंदिराचाच हा भाग असल्याचे सवर्ण समाजाकडून सांगण्यात येत होते आणि या समाज मंदिरामध्ये लाऊड स्पीकर, स्वयंपाकाचे भांडे, मंडप असे सामान ठेवण्यात येत होते. बौद्ध समाजाच्या लोकांना ज्यावेळेस कळाले की हे समाज मंदिर दलित वस्ती विकास योजनेतून आणि दलितांसाठी बांधण्यात आले आहे, त्यानंतर त्यांनी रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आंदोलन केले, प्रशासनाकडे पाठपुरावा केला आणि १५ दिवसांपूर्वी हे समाज मंदिर ताब्यात घेतले होते. 

मात्र १ मे रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास हिवरखेडा येथील काही महिला हातामध्ये पांढरा रंग आणि ब्रश घेऊन त्या ठिकाणी आल्या. त्यांनी समाज मंदिराच्या निळ्या रंगावर पांढरा रंग लावून समाज मंदिराचा ताबा घेतला. याबाबत बौद्ध बांधवांनी विचारणा केली असता, या महिला त्यांना म्हणत होत्या की हे समाज मंदिर केवळ बौद्धांचे नाही, तर या समाज मंदिरावर गावातील सर्व लोकांचा हक्क आहे. तसेच ते असे सांगत होत्या की या समाज मंदिरावर मातंग समाजाचा सुद्धा अधिकार असून मातंग समाजाच्या महिला सुद्धा आमच्या सोबत आहेत. याचाच अर्थ या गावातील मातंग समाजातील महिलांना हाताशी धरून सवर्ण जातीतील महिलांनी हे मंदिर ताब्यात घेतले आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार गावामध्ये मातंग समाजाचे एक घर आहे. 

हे समाज मंदिर बौद्ध आणि मातंग या दोन्ही समाजासाठी असून या समाज मंदिराचा वापर करण्यासाठी बौद्ध बांधवांनी मातंग समाजाला कधीही विरोध केलेला नाही. उलट हे समाज मंदिर ज्यावेळी गावातील सवर्ण समाजाच्या ताब्यात होते, त्यावेळी मातंग समाजातील कोणीही व्यक्तीने हे समाज मंदिर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नाही. आणि समाज मंदिर ताब्यावर ताब्यात घेतल्यानंतर सुद्धा बौद्ध समाजाने मातंग समाजाच्या व्यक्तींना सुद्धा या समाज मंदिराचा वापर करण्यासाठी संमती दिली. असे असतानाही मातंग समाजाच्या व्यक्तीला समोर करून गावातील सवर्ण समाजातील व्यक्तींनी हे मंदिर ताब्यात घेऊन त्याला पांढरा रंग लावल्याबद्दल लावल्यामुळे बौद्ध बांधवांमध्ये कमालीचा संतोष निर्माण झाला आहे. याबाबत हिंगोली जिल्हा प्रशासनाने वेळीच दखल घेऊन हे समाज मंदिर पुन्हा अनुसूचित जातीच्या लोकांच्या ताब्यात देणे गरजेचे झाले आहे.
तर समाज मंदिराचा पुन्हा ताबा घेऊन त्याला निळा रंग दिला जाईल- ॲड. रावण धाबे

हिवरखेडा येथील घटना जातीय वादातून घडलेली आहे हे स्पष्ट आहे. जातीयवाद रोखण्यासाठी शिवसेना-भाजपचे सरकार फेल ठरले असून बौद्ध आणि दलित समाजावर असेच अन्याय सुरू राहिले तर, शिंदे- फडणवीस सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील. हिवरखेडा येथील प्रकरणी जिल्हा प्रशासनाने आपले कर्तव्य पार पाडून हे समाज मंदिर अनुसूचित जातीच्या लोकांच्या ताब्यात दिले नाही तर आजाद समाज पार्टीच्या वतीने या समाज मंदिराचा ताबा घेतला जाईल आणि त्याला पुन्हा निळा रंग मारला जाईल. आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व परिणामांना हिंगोली जिल्हा प्रशासन जबाबदार राहील.
ॲड. रावण धाबे, प्रदेश सचिव, आझाद समाज पार्टी, महाराष्ट्र.
दरम्यान बौद्ध बांधवांवर होत असलेल्या अन्याय, अत्याचारांमध्ये हिंगोली जिल्ह्यात वाढ होत आहे. हिंगोली तालुक्यातील हिंगणी या ठिकाणी आंबेडकर जयंतीला परवानगी मिळाली असली तरी गावातून मुख्य मार्गाने जयंती काढू देण्यासाठी कळमनुरीच्या पोलिसांनी मज्जाव केला होता. तसेच परवानगी नाकारली. त्यानंतर हिवरखेडा येथील ही घटना समोर आली आहे.
तर मैदानात उतरून जातिवाद्यांना उत्तर देऊ- किरण घोंगडे 

हिवरखेडा येथील घटना अत्यंत निषेधार्ह असून याबाबत हिंगोली जिल्हा प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही, तर सवर्ण समाजाचे विरोधात आम्ही आजही दंड ठोकून त्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत. परंतु आम्ही बुद्धाचे अनुयायी असल्याने शक्यतो शांततेचे मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. परंतु आमची सहनशीलता संपल्यानंतर बुद्धासोबतच, सम्राट अशोक यांचे युद्ध सुद्धा आम्हाला माहिती आहे, याची नोंद घ्यावी.
- प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे, रिपब्लिकन सेना युवक आघाडी.

दरम्यान, या घटनेवर पोलीस प्रशासन तसेच पंचायत समिती, औंढा नागनाथ आणि जिल्हा प्रशासन काय भूमिका घेतली याकडे लक्ष लागले आहे. हिवरखेडा गावांमध्ये बौद्धांची संख्या अत्यंत कमी असून ५ ते ६ घरी आहेत. त्यामुळे बौद्ध बांधवांमध्ये प्रचंड सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याने त्यांना पोलीस संरक्षण देण्याची गरज आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने