बुद्ध विहारातच साजरी केली डॉ. आंबेडकर जयंती
हिंगोली: भीम जयंतीला प्रमुख मार्गाने परवानगी मिळावी यासाठी, पोलिसांच्या विरोधात हिंगणी येथील बौद्ध, आंबेडकरवादी समाज उच्च न्यायालयात गेला. आणि शेवटी न्यायालयाने पोलिसांनाच जयंतीचा मार्ग ठरविण्यासह इतर अटीशर्ती लादण्याचे अधिकार दिल्याने एक प्रकारे न्यायाधीशाच्या खुर्चीवरच बसविण्यात आलेल्या कळमनुरी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकाने गावातील मुख्य मार्गाने जयंती मिरवणूक काढण्यासाठी परवानगी दिलीच नाही. त्यामूळे, भीक नको हक्क पाहिजे म्हणत, हिंगणी येथील बौद्ध, आंबेडकरवादी समाजाने एक प्रकारे निषेध व्यक्त करीत जयंतीची मिरवणूक न काढता, बुद्ध विहारातच जयंती साजरी करून रोष व्यक्त केला.
हिंगोली तालुक्यातील हिंगणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला परवानगी देण्यासह, जयंतीची मिरवणूक गावातील मुख्य मार्गाने काढण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी हिंगणी ग्रामस्थांनी याचिकाकर्ते अनिता सरतापे, राजकुमार सरतापे, गौतम सरतापे यांचे मार्फत मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका (५२२/२०२३) दाखल केली होती. या याचीकेवर निकाल देताना न्यायालयाने पोलिसांना जयंती काढण्याची परवानगी दिली.
मात्र जयंतीचा मार्ग ठरविण्यासह जयंती काढणाऱ्यांवर अटीशर्ती लागण्याचे अधिकार पोलिसांना म्हणजेच प्रतिवादी क्र. ४, कळमनुरी पोलिस ठाण्याच्या ठाणेदाराला दिले. मात्र, याचा अर्थ असा नाही की पोलिसांनी मनमानी करून किंवा, गावातील बहुसंख्य लोकांच्या दबावाखाली येऊन किंवा त्यांच्या इशाऱ्यावर अल्पसंख्य समाजाची मुस्कटदाबी करावी ! या प्रकरणी पोलिसांनी आणि विशेषत: कळमनुरी पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकाने आपल्या अधिकाराचा वापर करून संपूर्ण गावातून जयंती काढण्यासाठी परवानगी देणे अपेक्षित होते.
त्यासाठी त्यांना आवश्यक तेवढा फौजफाटा सुद्धा शासनाकडून मिळणे शक्य होते आणि मिळाला सुद्धा ! असे असतानाही भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारानुसार कायदेशीर मागणी करणाऱ्यांच्या बाजूने निर्णय न घेता बेकायदेशीरपणे मिरवणुकीला विरोध करणाऱ्या लोकांच्या बाजूने निर्णय घेवुन गावातील मुख्य मार्गाने मिरवणूक काढण्याची परवानगी न देता, मुख्यत: बौद्धवाडा आणि आजूबाजूच्या घराजवळील रस्ता दिला. त्यामुळे हिंगणी येथील बौद्ध ग्रामस्थांनी गावात जयंतीची मिरवणूक न काढता गावातील बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली.
भीम जयंती अत्यंत उत्साहात साजरी केली असली तरी बौद्ध बांधवांमध्ये प्रचंड असंतोषाची भावना यावेळी दिसून आली. दरम्यान, आज जयंतीच्या दिवशी जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, नेत्यांना पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले होते. हिंगोलीत आझाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव ॲड. रावण धाबे, वंचित आघाडीचे रवींद्र वाढे, ज्योतीपाल रणवीर, चंद्रमुणी पाईकराव, ॲड. अभिजित खंडारे, योगेश नरवाडे, अक्षय इंगोले, प्रीतम सरकटे यांच्यासह अनेक नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. तर औंढा येथे रिपब्लिकन सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्यासह अनेक जणांना स्थानबद्ध करण्यात आले होते.
पीआयची भूमीका संशयास्पद
याबाबतीत कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, मुंडे यांची भूमिका संशयास्पद राहिली आहे. कारण यामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या नावाखाली आपल्या अधिकारांचा गैरवापर होत असल्याचे यामध्ये दिसून येत आहे. भीम जयंतीला हिंगनी गावातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढण्यासाठी परवानगी न देण्यामागची ठोस कारणे काय आहेत ? गावातील काही लोकांचा गावातील प्रमुख मार्गांने मिरवणूक जाण्याला विरोध आहे, ही बाब पोलिसांच्या गुप्त वार्ता विभागाकडून स्पष्ट झाली का? तसे असल्यानेच तशी परवानगी नाकारली असेल, तर या जयंतीला ज्या ज्या लोकांनी विरोध केला असेल, त्यांच्यावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली की नाही? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. तसेच जयंतीला विरोध करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे सोडून पोलिसांनी आंबेडकरी समुदायातील लोकांवरच वेगवेगळ्या प्रतिबंधात्मक कारवाया का केल्या? याचाही जाब मिळाला पाहिजे.
दलाल इलेक्ट्रॉनिक मीडियाने दखल घेतली नाही
मौजे हिंगणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे प्रकरण गेल्या ३ वर्षांपासून गाजत असताना दलाल आणि राजकारण्यांचे बटिक झालेल्या मुख्य प्रवाहातील इलेक्ट्रॉनिक्स मीडियाने या घटनेची यावर्षी बिलकुल दखल दखल घेतली नाही. ५००-१००० रुपये दिले की, हातात चॅनलचे बूम घेवून नेत्यांच्या मागे पिसाटपणे पाळणारे, तोंडाला फेस येईपर्यंत बोंबलणारे वृत्तवाहिन्यांचे हिंगोली जिल्ह्यातील पत्रकार, प्रतिनिधी हिंगणी गावाकडे फिरकले नाहीत किंवा या जयंतीची बातमी सुद्धा त्यांनी टीव्हीवर दाखवली नाही. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया किती लाचार आणि भाडखाऊ वृत्तीचा झाला आहे, हेच यामधून दिसून येते. पोलिसांच्या भीतीपोटी की राजकीय नेत्यांची चाटूगीरी करण्यासाठी मिडियावाले आले नाहीत, हे कळायला मार्ग नाही. एक मात्र खरे की, स्वतःला अग्रगण्य म्हणूण घेणारा हा मीडिया पत्रकारिता 'धर्म' निभवण्याऐवजी आपला किमान रेट ५०० रूपये ठरवून 'धंदा' करतोय हे स्पष्ट झाले आहे.
हिंगणी गावाला आली छावणीचे स्वरूप
हायकोर्टाच्या आदेशानंतर जयंतीला परवानगी मिळाल्याने हिंगोली जिल्हा पोलिसांनी चौक पोलीस बंदोबस्त राखला होता. हिंगणी येथे बौद्ध समाजाची लोकसंख्या सुमारे १०० ते १२५ एवढी आहे. आणि पोलिसांचा फौजफाटा, मिळालेल्या माहितीनुसार सुमारे ८०० च्या घरात होता. त्यामुळे प्रत्येक बौद्ध, आंबेडकरवादी व्यक्तीच्या मागे सरासरी ८ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आल्यासारखी परिस्थिती होती.