हिंगोली: शबरी आर्थिक विकास महामंडळाकडून आदिवासी समाजातील लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. हे अनुदान सध्याचा खर्च पाहता पुरेसे नसून ते ५ लाख रुपये करण्याची मागणी आझाद समाज पार्टी, हिंगोलीच्या वतीने आदिवासी प्रकल्प अधिकारी, कळमनुरी या कार्यालयाकडे दि. १० मार्च २०२३ रोजी करण्यात आली आहे.
याबाबत आजाद समाज पार्टीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनानुसार शहरी आणि ग्रामीण भागातील घरकुलांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. शहरी भागात २ लाख ४० हजार तर ग्रामीण भागात १ लाख २० हजार एवढे तूटपूंजे अनुदान दिले जाते. या अनुदानामध्ये लाभार्थ्यांच्या बांधकामाचा पायाभरणीचा खर्च सुद्धा निघत नाही. तसेच ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना तर मिळणारे अनुदान हे नगण्य असे आहे.
कारण ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना सुद्धा लोखंड, सिमेंट, रेती, खडी त्याचबरोबर लेबर या सर्व कामावर शहरी भागा एवढाच खर्च करावा लागतो. आणि अनुदान मात्र शहरी भागाच्या ५० टक्केच दिले जाते. अशा परिस्थितीत घरकुलाचे बांधकाम कसे करायचे? हा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागासाठी सरसकट ५ लाख रुपये एवढे अनुदान, शबरी विकास महामंडळाकडून आदिवासी लाभार्थ्यांना देण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनावर आझाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव ॲड. रावण धाबे, हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुनील बगाटे, आदिवासी पँथरचे प्रशांत बोडखे, हिंगोलीचे तालुका कार्याध्यक्ष ॲड. नितीन शिखरे, हरिभाऊ पिंपरे, शिवाजी वानोळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.