पत्रकार खंडेलवाल मारहाण प्रकरण: ओमकांत चिंचोलकर सह इतर कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी!

अप्पर पोलीस महासंचालक(प्रशासन) यांचे आदेश


हिंगोली: हिंगोली येथील पत्रकार कन्हैया खंडेलवाल यांना 29 मार्च 2020 रोजी शहर वाहतूक शाखेचे तत्कालीन सपोनि ओमकांत चिंचोलकर सह इतरांनी मारहाण केल्याची घटना घडली होती.यासंदर्भात कन्हैया खंडेलवाल यांनी याबाबत वरिष्ठांना वारंवार तक्रारी देखील केल्या होत्या.

खंडेलवाल यांना मारहाण प्रकरणी संबंधित पोलिसांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.याप्रकरणा संदर्भात राज्य शासनाचे अप्पर पोलीस महासंचालक(प्रशासन) यांनी आदेश पारित करताना विभागीय चौकशी अधिकारी म्हणून हिंगोली  उपविभागीय 
पोलिस अधिकारी ग्रामीण यांची नियुक्ती केली असून तीन महिन्याच्या आत चौकशी नियमांचे काटेकोर पालन करून शीघ्रतेने चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नांदेड पोलीस उपमहानिरीक्षक यांच्याकडून पाठविण्यात आलेल्या 17 मार्च 2021 च्या पत्राच्या अनुषंगाने अप्पर पोलीस महासंचालक यांनी विभागीय चौकशीचे आदेश पारित केले आहेत. 

यानुसार हिंगोली शहर वाहतूक शाखा येथील तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्यासह पोलिस कर्मचारी आनंद मस्के, गजानन राठोड, अमित मोडक व चंद्रशेखर काशीदे यांच्याविरुद्ध बेशिस्त व कसुरीच्या अनुषंगाने चौकशी करण्याकरिता पोलीस उपअधीक्षक  हिंगोली ग्रामीन यांची नेमणूक केली आहे. सदर आदेश नमूद करताना विभागीय चौकशी करण्याइतपत पुरावा असल्याची खात्री झाल्याचे देखील त्यांनी नमूद केले आहे. त्याचबरोबर विभागीय चौकशी पूर्ण न झाल्यास त्याबाबतचा सयुक्तिक कारणासह तसेच आवश्यक कागदपत्रांच्या प्रती सह संबंधित प्राधिकार्‍यांकडे मुदतवाढ प्रस्ताव पाठवावा असे देखील आदेश देण्यात आले आहेत. अप्पर पोलीस महासंचालकांच्या या आदेशामुळे मात्र हिंगोली पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या