जीवनात काहीतरी अजून चांगले व उद्दात्त करण्याच्या शोधापोटी आपल्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी अमरावती जिल्ह्यातील प्रकल्प अधिकारी धारणी (आयएएस) या पदावर कार्यरत असलेल्या वैभव दासू वाघमारे या ३० वर्षीय अधिकारी तरुणाने आपल्या सर्वोच्च नोकरीचा राजीनामा दिला आहे. आपल्या वाढदिवशी त्यांनी आपला हा निर्णय जाहीर करीत सर्वांनाच धक्का दिला. सामाजिक काम करण्यामागे आणि हा निर्णय घेण्यामागे तथागताची प्रेरणा असल्याचे त्यांनी जाहीर करीत भविष्यात सामाजिक कार्यात व्यस्त राहण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
2019 च्या कॅडरमधील अधिकारी असलेले वैभव दासू वाघमारे यांनी ऑल इंडीया रॅन्कीगमध्ये 401 वा क्रमांक पटकाविला होता. त्यांची एक वर्षापूर्वी अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी या पदावर नियुक्ती झाली होती. आपल्या कार्यकाळात त्यांनी केवळ कार्यालयात बसून काम न करता आदिवासींसोबत प्रत्यक्ष काम केले. त्यांनी मोहफुलांच्या माध्यमातून मेळघाटातील सुमारे 300 गावांत मोहफुल बँक नावाची संकल्पना रुजविली. यातून शार्क थिंक प्रोजेक्ट अंतर्गत नुक्लिअर बँकेमार्फत स्थानिक गरजा पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे.
8 एप्रिल रोजी आदिवासी आश्रमशाळा टिटंबा येथे आदिवासी विकास योजनांची माहितीसाठी मेळघाट विकास दूत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांना मार्गदर्शन केले. माणसाला जगण्यासाठी केवळ महिना 10 हजार रुपये पुरेसे आहेत. आदिवासी समाज तर भाकरी साठी वनवन फिरतो. त्यामूळे जिवनात काहीतरी उच्च करण्याची हीच वेळ आहे. असे सांगत त्यांनी राजीनामा दिल्याचे घोषीत केले.
आयएएसचा राजीनामा देणारे कोण आहेत वैभव दासू वाघमारे?
पंढरपूर तालुक्यातील पेहे येथील ते रहिवाशी असून वैभव दासू वाघमारे असे त्यांचे पुर्ण नाव आहे. आयएएस होण्यापुर्वी ते नागपूर येथे आय.आर.एस अधिकारी म्हणून कार्यरत होते. यू.पी.एस.सी परीक्षेत पहिल्यांदा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी रेल्वे विभागात उच्चपदस्थ अधिकारी म्हणून सेवा बजावली. यानंतर पुन्हा आय.आर. एस परीक्षा उत्तीर्ण झाले. मात्र आयएएस होण्याचे त्यांचे स्वप्न होतेच. 2019 साली झालेल्या आय. ए. एस परीक्षेत त्यांनी घवघवीत यश संपादन करून भारतातील एक महत्वाच्या पदावर आपली जागा निश्चित केली.
वैभव वाघमारे यांचे प्राथमिक शिक्षण हे पेहे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले. तर माध्यमिक शिक्षण नवोदय विद्यालय पलूस येथे झाले. पुढील शिक्षण वालचंद महाविद्यालय सांगली येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घेत त्यांनी कॉम्प्युटर इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा यू.पी.एस.सीकडे वळविला. दोन वेळेस आयआरएस झाल्यावर तिसऱ्यांदा आय.ए.एस परीक्षेत यश मिळवले आहे. त्यांचे कुटुंब शेतकरी आहे. आई- वडील शेतकरी आहेत. एक बहीण गृहिणी तर दुसरी बहीण शिक्षिका आहे.