हिंगोली- येथील बावनखोली भागात 2018 मध्ये त्यावेळी केवळ 7 वर्षे वय असलेल्या चिमुकलीवर बलात्कार करणार्या नराधमाला येथील सत्र न्यायालयाने मरेपर्यंत कारावासाची शिक्षा आणि 25 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
मधूकर निवृत्ती वाठोरे (वय- 57 वर्षे रा. बावनखोली, हिंगोली) असे शिक्षा झालेल्या नराधमाचे नाव आहे. 2018 मध्ये ही घटना घडली आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आले असून यात पिडीत मुलीची साक्ष महत्वाची ठरली आहे. तसेच पिडीतेचा वैद्यकीय अहवाल सुद्धा गुन्ह्याशी जुळणारा आला. दोषारोप दाखल झाल्यावर हे प्रकरण येथील सत्र न्यायालयात चालले. सत्र न्यायाधिश के.जी. पालदेवार यांचे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून भादविचे कलम 376 (एबी), 506(2) आणि पोक्सो कायद्याचे कलम 5 (एम) व 9 (एम) खाली मरेपर्यंत कारावास आणि 25 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पिडीतेला नुकसान भरपाईची रक्कम म्हणून देण्यात येणार आहे. सरकार पक्षातर्फे अॅड. एस.एस. देशमूख यांनी काम पाहिले. तर महिला फौजदार एस.एस. केंद्रे यांनी प्रकरणाचा तपास केला होता.