हिंगोलीत सातव समर्थकांचे पंख छाटण्यास सुरुवात? विलास गोरे पक्षातून निलंबित

हिंगोली/बिभीषण जोशी- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी बाळासाहेब देशमुख हे १० दिवसांपूर्वी हिंगोलीत पक्ष संघटन कार्यक्रमासाठी आले असताना त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करुन सातव गट समर्थक, पक्षाचा कार्यकर्ता विलास गोरे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. विलास गोरे यांच्यावर झालेली कारवाई म्हणजे सातव समर्थकांचे पंख छाटण्यास सुरुवात झाली असल्याचे बोलले जात आहे.


काँग्रेसचे जिल्हा प्रभारी तथा प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख हे काँग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी १० दिवसांपूर्वी हिंगोलीत आले असताना सातव समर्थक आणि भाऊ पाटील समर्थक यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली होती. त्यानंतर पक्षामध्ये दुफळी निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर ही कारवाई झाल्याने पक्षात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे.
विलास गोरेकडे पक्षाची मोठी आणि प्रभावी जबाबदारी नसली तरी ते अनेक वर्षांपासून सातव घराण्याचे समर्थक राहिले आहेत. दिवंगत खासदार राजीव सातव यांचे ते कट्टर समर्थक होते. खासदार सातव यांच्या निधनानंतर ते काँग्रेसच्या आमदार प्रज्ञाताई सातव यांच्या सोबत सक्रीय झाले.
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख हिंगोलीत पक्ष कार्यालयात आले असताना त्यांना विलास गोरे यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची तक्रार होती. त्यानंतर भाऊ पाटील समर्थक व सातव समर्थक या दोन गटात सुद्धा पक्षी कार्यालयात परिसरात मोठा राडा झाला होता. जिल्हा प्रभारी देशमुख हे माजी आमदार भाऊ पाटील यांच्या निवासस्थानी का गेले या मुद्द्यावरून हा वाद झाला होता. तर माजी आमदार भाऊ पाटील यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करताना म्हटले होते, की त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अनेक वर्षांपासून हेतुपुरस्सर डावलण्यात येत आहे. पक्षांचे इमानदार कार्यकर्ते असताना आमच्यावर अन्याय होतो अशी तक्रार त्यांनी केली होती. 

या वादावादीनंतर पक्ष निरीक्षक बाळासाहेब देशमुख यांनाच लक्ष्य करून त्यांना धक्काबुक्की करण्यापर्यंत मजल गेल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. या घटनाक्रमात पक्षाचे कार्यकर्ते विलास गोरे यांनी बाळासाहेब देशमुख यांना अश्लील शिवीगाळ केली असल्याचे पक्षाच्या वरिष्ठांचे म्हणणे आहे. या बाबीची गंभीर दखल घेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार विलास गोरे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. याबाबत संघटन व प्रशासन विभागाचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांना 12 फेब्रुवारी 2022 रोजी पत्र पाठवले असून या पत्रानुसार विलास गोरे यांना निलंबित करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या