पहिली पत्नी आणि आईला वार्‍यावर सोडणार्‍या सेवानिवृत्त फौजदाराला न्यायलयाचा दणका

पत्नी आणि आईला प्रत्येकी 7000/- रुपये प्रती माह पोटगी देण्याचे आदेश

हिंगोली:- पहिली पत्नी जिवंत असताना दुसरी पत्नी करून पहिली पत्नी आणि आईकडे दुर्लक्ष करणार्‍या सेवानिवृत्त फौजदाराला येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आय.ए.वाय.ए. खान यांच्या न्यायालयाने चांगलाच धडा शिकविला आहे. प्रकरण दाखल करण्यात आले तेव्हापासून प्रती माह 7000/- रूपये पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून ही पोटगीची रक्कम 5 लाख 62 हजार एवढी आहे.
हिंगोली शहरात पारधीवाडा भागातील कौशल्याबाई मंगल चव्हाण आणि त्यांची सासू लक्ष्मीबाई जंगलाजी चव्हाण यांनी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात फौजदारी प्रक्रीया संहितेच्या कलम 125 नुसार प्रत्येकी प्रती महिना 10 हजार रूपये पोटगी मिळण्यासाठी 3 ऑगस्ट 2017 रोजी अर्ज (फौजदारी किरकोळ अर्ज क्र. 165/2017) दाखल केला होता. कोरोना काळामूळे प्रकरण थोडेफार दिर्घ कालावधीसाठी चालले. प्रतूत प्रकरणात गैरअर्जदार मंगल जंगलाजी चव्हाण हे सेवानिवृत्त फौजदार आहे. त्यांनी दुसरे लग्न केल्यामूळे त्यांची पहिली पत्नी कौशल्याबाई व आई लक्ष्मीबाई यांचेकडे त्यांनी कायम दुर्लक्ष केले. तसेच पहिल्या पत्नीला मारहाण करणे, तीचा नेहमीच अवमान करणे, आईला सुद्धा त्रास देणे, पोलिस ठाण्यात गेल्यास जिवे मारण्याच्या धमक्या देणे असले प्रकार सुरू केले. परिणामी पहिली पत्नी आणि आई यांचेवर अत्यंत हालाखीचे जिवन जगून उपासमारीची वेळ आली. उलट गैरअर्जदार मंगल जंगलाजी चव्हाण यांना सेवानिवृत्ती वेतन मिळत आहे. शिवाय दुसर्‍या पत्नीच्या नावे शेती, आरसीसी बांधकाम केलेले घर, भाडे तत्वावर दिलेले व्यापारी गाळे असल्याने चांगले उत्पन्न मिळते.

या सर्व बाबिंचा विचार करून न्यायालयाने 16 डिसेंबर 2021 रोजी निकाल दिला. निकालानुसार, प्रकरण दाखल झाले तेव्हापासून गैरअर्जदार मंगम जंगलाजी चव्हाण यांनी अर्जदार पत्नी कौशल्याबाई मंगल चव्हाण आणि आई लक्ष्मीबाई जंगलाजी चव्हाण यांना प्रत्येकी प्रती महिना 7 हजार रुपये पोटगी द्यावी, तसेच निकाल लागल्यापासून 30 दिवसाच्या आत न्यायालयीन प्रकरणाच्या खर्चापोटी 2 हजार रूपये अर्जदाराना देण्यात यावेत, असा आदेश दिला आहे. अर्जदारांच्या वतीने अ‍ॅड. रावण धाबे, अ‍ॅड. एस.डी. घाडगे यांनी काम पाहिले. तर अ‍ॅड. ए.डी. खंदारे, अ‍ॅड. एन.टी. अंभोरे यानी सहाय्य केले. गैरअर्जादराकडून थकीत रक्कम आणि पुढील एक वर्षाची रक्कम अशी एकूण 7 लाख 30 हजार वसुलीची प्रक्रिया फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 125(3) नुसार सुरू करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या