जाणून घ्या, जय भीम सिनेमा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमावर अधारीत आहे आणि काय आहे हेबीअस कॉर्पस?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार (Dr. Babasaheb Ambedkar- the architect of constitution of India) म्हटले जाते आणि ते खरेही आहे. कारण भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी जे कष्ट त्यांनी घेतले, तेवढे घटना समितीतील कोणत्याच पदाधिकारी किंवा सदस्याने घेतले नाहीत. बाबासाहेबांनी राज्यघटनेतील एक ना एक कलम आपल्या हाताखालून घातले आहे. त्यामूळे त्यांना प्रत्येक कलमाचे महत्व, मूल्य माहिती होतेच. त्यावेळच्या 395 कलमांपैकी कोणत्याही एका कलमाला महत्वपुर्ण आणि एका कलमाला गौण समजणे शक्य नसले तरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एका कलमाला भारतीय राज्यघटनेचे ह्रदय आणि आत्मा संबोधले आहे. आणि ते म्हणजे कलम 32 आणि याच कलमाचा भाग असलेले कलम 226.
आणि सध्या गाजत असलेला जय भीम सिनेमा (Jai Bhim movie/cinema) याच कलमांवर आधारीत आहे. भारतीय राज्यघटनेतील भाग 3 (कलम 12 ते 35) मध्ये देण्यात आलेल्या मुलभूत अधिकारांचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकार आणि अंतीमतः न्यायालयांची आणि त्यातही सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांची असते. एखाद्या व्यक्तीच्या किंवा समुहाच्या मुलभूत अधिकारांवर गदा आली, ते अधिकार हिरावले गेले किंवा त्यांचे रक्षण करण्यात सरकार अपयशी ठरले तर न्यायालयात रीट याचिका दाखल करून आपल्या अधिकारांची पुनर्स्थापना केली जावू शकते. या रीट (Writ Petitions) (म्हणजेच आदेश किंवा निदेश) याचिका 5 प्रकारच्या आहेत. त्या म्हणजे 1. हेबीएस कॉर्पस (Habeas Corpus)/ देहोपस्थिती, 2. मंडॅमस (Mandamus)/ महादेश, 3. प्रोहीबीशन (Prohibition)/प्रतिबंध, 4. क्वो वॉरंटो (Quo warranto)/क्वाधिकार, 5. सर्सेओररी (Certiorari)/प्राकर्षण. या बाबतीत प्राधिलेख/आदेश काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे.

आज आपण जय भीम या सिनेमात उल्लेखीत, हेबीएस कॉर्पस (Habeas Corpus)/ देहोपस्थिती, या रीटबाबत माहिती घेवूत. हेबीएस कॉर्पस (Habeas Corpus)/ देहोपस्थिती या रीटचा अर्थ आहे, देह/शरीर उपस्थित करा किंवा भौतिक अस्तित्व समोर आणा. जेव्हा एखादे सरकार किंवा यंत्रणा बेकायदेशीरपणे एखाद्याला स्थानबद्ध करते, तेव्हा अज्ञात ठिकाणी स्थानबद्ध केलेल्या त्या व्यक्तीच्या नातेवाईकाकडून किंवा मित्रांकडून या याचिकेचा वापर केला जावू शकतो. ज्यावेळी ही याचिका दाखल केली जाते, त्यावेळी सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय, स्थानबद्ध करणार्‍या सरकारला किंवा यंत्रणेला, संबंधित व्यक्तीला कोणत्या कोणत्या आधारावर स्थानबद्ध केले याचा जाब विचारू शकते. आणि झालेली स्थानबद्धता बेकायदेशीर असेल, अगम्य असेल तर त्या व्यक्तीला तात्काळ मूक्त करण्याचे आदेश न्यायालय देवू शकेल.

या सिनेमात 1993 मध्ये इरूरल या आदिवासी जमातीतील राजाकन्नू नावाच्या इसमावर चोरीचा खोटा गुन्हा दाखल होतो. त्याच्यावर आणि त्याचा भाऊ आणि नातेवाईकावर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्याची कबूली देण्यासाठी पोलिसांकडून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले जातात. ही बाब राजाकन्नूची पत्नी सेंगणी हिने स्वतः पाहिलेली असते. तिला भिती असते की, पोलिसांच्या अत्याचारात त्यांचा मृत्यू देखील होवू शकतो. आणि नंतर त्यातूनच पुढे न्यायालयीन लढाई चालू होते आणि तो न्यायालयीन लढा वकील के. चंद्रू यशस्वी करतात. सिनेमात दाखविल्यानुसार, राजाकन्नूची पत्नी (नातेवाईक) आपल्या पती आणि इतर नातेवाईकांच्या सुटकेसाठी, त्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना हजर करण्यासाठी ही याचिका दाखल करते. न्यायालयात झालेल्या युक्तीवादात वकील के. चंद्रू हे याचिकेची गुणवत्ता, गरज पटवून देतात आणि त्यावर ही याचिका मद्रास हायकोर्ट भारतीय राज्यघटनेचे कलम 226 नुसार दाखल करून घेते. आणि मग पुढे सिनेमात आलेल्या कथेनुसार, आरोपींची स्थानबद्धता ही बेकायदेशीर असल्याचे न्यायालयात सिद्ध होते आणि आरोपींची सूटका देखील होते. त्यात याचिकाकर्त्या सेंगणीने वकील के. चंद्रू यांच्या मदतीने मोठी लढाई जिंकलेली असते. परंतू, ज्याच्यासाठी तीचा लढा चालू होता, तो तिचा पती राजाकन्नू याचा मात्र कोठडीत अगोदरच मृत्यू झालेला असतो.

विशेष बाब म्हणजे कलम 32 हे भाग 3 मधील मुलभूत हक्क/अधिकारांचा भाग आहे. तर कलम 226 हे मुलभूत हक्क/अधिकारांचा भाग नाही. असे असले तरी, कलम 32 मधील रीट कलम 226 खाली उच्च न्यायालयात दाखल करता येतात. तर 32 खालील याचिका केवळ सर्वोच्च न्यायालयातच दाखल करता येते. परंतू, एखादी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करायची असेल तर, अगोदर उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागते किंवा दाखल केली गेली नसेल तर का केली नाही आणि सर्वोच्च न्यायालयातच दाखल करणे का गरजेचे आहे हे न्यायालयात स्पष्ट करावे लागते. थोडक्यात कलम 32 आणि 226 मध्ये सारख्याच रीट दाखल करता येतात. फरक फक्त न्याय अधिकार/कार्यक्ष्रेत्राचा आहे. ‌‌‌
--अ‍ॅड. रावण धाबे, हिंगोली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या