रावण दहन करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करा

हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन

हिंगोली: हिंगोली जिल्ह्यात रावण दहन करून गर्दी जमा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी रावण सन्मान कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक आणि हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी यांना भेटून निवेदन सुद्धा देण्यात आले आहे.

याबाबत देण्यात आलेल्या निवेदनावर भारतीय आदिवासी पॅंथरचे प्रमुख प्रशांत बोडखे, आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रावण धाबे, ॲड. अभिजीत खंदारे, आझाद समाज पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. मारोती सोनुले, आझाद समाज पार्टीचे युवा नेते ॲड. बगाटे रावण, साम्राज्य ग्रुपचे अध्यक्ष सुखदेव कोकाटे, उपाध्यक्ष राम ढाकरे यांच्या यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की रावण दहन कार्यक्रम कोरोना नियमावलीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित असताना सुद्धा हिंगोली जिल्ह्यात हिंगोली आणि वसमत या ठिकाणी आयोजकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा करून दिनांक १५ ऑक्टोबर २०२१ रोजी रावण दहन केले आहे. 

तसेच राजा रावण हा आदिवासी समाजाची अस्मिता आहे, हे माहीत असतानाही हेतुपुरस्सर रावण दहन करून या समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे कोरोना नियमावलीचा भंग करणे, आदिवासी समाजाच्या भावना दुखवणे याबद्दल रावण दहन कार्यक्रम आयोजन करणारे आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेले अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यावर आयपीसी आणि एससी-एसटी कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर आणि पोलीस उपाध्यक्ष सतीश देशमुख यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या