सामाजिक भेद निर्माण करणारी रावण दहनाची परंपरा....

वाल्मिकि ऋषीलिखित रामायणात राम व रावण या दोन राजांमध्ये झालेला संघर्ष दाखविण्यात आला आहे. हा संघर्ष केवळ चांगला आणि वाईट यांच्यातील नव्हता. तर हा संघर्ष आपले अधिपत्य, आपले प्राबल्य दाखविण्यासाठी, शक्ती दाखविण्यासाठी सुद्धा होता. म्हणजेच रामायणातील हा संघर्ष शुद्ध राजकीय स्वरूपाचा होता. त्यातही हा संघर्ष आर्य आणि अनार्य या दोन शक्तीमधील होता. आर्य म्हणजेच कधीकाळी युरेशीया या भुखंडातून भारतात दाखल झालेल्या टोळ्या आणि पुढे ज्यांनी भारतात आपले राज्य स्थापन केले. तर अनार्य म्हणजे जे आर्य नाहीत, जे नागवंशीय आहेत, जे भारताचे मुलनिवासी आहेत.
रामायणाला जर एक धार्मिक ग्रंथ मानायचे असेल तर, मग रामाला देव मानावे लागेल आणि मग देवाचा शत्रू म्हणून सहाजिकच रावणाला दानव ठरविले गेले. आणि रामायणाला एक ऐतिहासिक ग्रंथ मानले तर मग राम आणि रावण हे या दोघांनाही त्या-त्या प्रदेशाचे, देशाचे राजे मानावे लागेल. धार्मिक बाब पाहिले तर आसूर, दानव, राक्षस असलेल्या रावणाच्या व्यक्तीमत्वाला आपोआपच मर्यादा पडणार. कारण कोणत्याही धर्मग्रंथात सैतान असो की राक्षस, दानव यांचे पात्र मुळातच पराभूत होण्यासाठी निर्माण करण्यात आलेले असते. त्यांना अगोदर पराक्रमी, सद्गूणी राक्षस यासाठीच ठरविले असते की, देवाच्या हातून त्याचा पराभव करून, देवाला महापराक्रमी ठरवायचे असते.

देवत्वाचाच विचार केल्यास सिकंदरने त्यावेळी ज्ञात असलेल्या बहुतांश भुप्रदेशावर पाय ठेवला होता. तसे प्रत्यक्ष देव असलेल्या, या विश्वाच्या निर्मीतीत महत्वाची भूमिका बजावणार्‍या रामाला, अर्धा भारतही का काबीज करता आला नव्हता, देव असूनही आपल्या पत्नीचे चारित्र्य भंग पावले की नाही हे का समजले नाही, रावणाचा प्राण बेंबीत आहे की कुठे हे बिभिषणाने न सांगता का कळले नाही, लक्ष्मणाला वाचविणारी संजिवणी बुटी पर्वतावर नेमकी कुठे आहे हे का कळाले नाही? ज्ञान प्राप्त करून नंतर ज्ञानदान करणार्‍या एक ऋषीचा (शंबूकाचा) केवळ तो जातीने क्षुद्र आहे म्हणून वध करणारा आणि एका अबला महिलेचे भाऊ लक्ष्मणामार्फत नाक व कान कापणारा राम महापराक्रमी कसा? असले साधे साधे प्रश्न निर्माण होतात. तर एक महान शिवभक्त, महाज्ञानी, महापराक्रमी, प्रजाहितदक्ष, सोन्याने माखलेली लंका असणारा महाश्रीमंत आणि शेवटच्या क्षणी लक्ष्मणाला कानमंत्र घ्यावासा वाटणारा राजा रावण असा अचानक क्रूर कसा झाला, त्याने काय गुन्हा केला की त्याच्या मरणावरही जल्लोष केला जावा, या प्रश्नांची उत्तरे आजही रावणाला मानणारा बहूजन समाज शोधत आहे.

रामायण एक दंतकथा असेल तर, राम आणि रावणाबद्दल बोलणे, त्यांचे गूण-अवगूण याबद्दल चर्चा करण्यात काहीही अर्थ राहणार नाही. परंतू रामायण जर ऐतिहासीक असेल, वास्तवात घडले असेल तर, मग इतिहासाची चिकीत्सा व्हायला काही हरकत नसावी. ही चिकीत्सा होत असताना मात्र अमूक व्यक्तीला मोठे दाखविण्यासाठी दुसर्‍या व्यक्तीची हेतूपुरस्सर उंची कमी करायची, हा खाक्या चालणार नाही. शेवटी रावण हा अनार्य, द्रविडी वंशाचा नायक होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह नाग लोकांनीच ताब्यात घेतला होता आणि अंत्यविधीही त्यांनीच केला. शेवटी हे नागवंशीय आहेत तरी कोण? ते म्हणजे मुलनिवासी भारतीय ! त्यामूळे रावणाविषयी आत्मीयता असणारा मोठा वर्ग आज भारतात आहे. राजा रावण हे आदिवासी समाजाचे कुलदैवत असल्याचे तो समाज मानत आला आहे. असे असताना आदिवासी, बहुजन समाज राजा रामाबद्दल कधीही दुष्ट हेतूने वागत आला नाही किंवा रामाचा अनादरही करीत नाही.

राजा रावणाचे तामिळनाडू राज्यात 335 मंदिरे आहेत. मेघनाथ, मैशासूर, कुंभकर्ण, शुर्पनखा यांचीही त्या राज्यातच नव्हे तर भारतात अनेक ठिकाणी पुजा केली जाते. एक ऐतिहासिक मतप्रवाह असेही सांगतो की, पुष्यमित्र शूंग म्हणजेच राम आणि शेवटचा मौर्य सम्राट बृहदरथ म्हणजेच रावण! मुलनिवासी राजा बृहदरथाची पुष्यमित्र शूंगाने हत्या केली आणि नंतर भारतात विषमतावादी समाजरचना निर्माण झाली. अशा परिस्थितीत केवळ परंपरा आहे म्हणून राजा रामाचा जयघोष करीत असतांना, वर्षानुवर्षे महानायक रावणाचे केवळ दहनच करण्यात येत नाही, तर त्याच्या मृत्यूचा जल्लोष करण्यात येतो. परंपराच सामाजिक सद्भाव उध्वस्त करीत असतील, तर असल्या परंपरा जोपासाव्यात काय? यावर शासन पातळीवर विचार व्हायला हवा. 
                                                        ---लेखक, अ‍ॅड. रावण धाबे, हिंगोली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या