आमदार नवघरे आणि माजी आमदार मुंदडा यांच्या कृत्यामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या

खासदार हेमंत पाटील यांचा आरोप; शिवप्रेमींसाठी केसेस मागे घेण्याची केली मागणी....

हिंगोली: वसमत शहरात १३ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याच्या आगमन प्रसंगी राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे आणि माजी आ. जयप्रकाश मुंदडा यांच्या कडून अनावधानाने जो निंदनीय प्रकार झाला त्यामुळे तमाम शिवभक्त शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. 
अखंड हिंदुस्थानचे दैवत , मराठी मनाचे मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पावित्र्य अबाधित राहावे याकरिता गोदावरी, आसना, पूर्णा, कयाधु, पैनगंगा या पाच नद्यांचे जल आणून जलाभिषेक करण्यात येणार आहे . या सोहळ्याला शिवसैनिक व शिवप्रेमींनी उद्या १७ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता हजारोंच्या संख्येने वसमत येथे उपस्थित राहावे असे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे .

वसमत वासियांची मागील ४० वर्षाची मागणी १३ ऑक्टोबर २०२१ रोजी पूर्ण झाली मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचे आगमन झाले . यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये अतिउत्साहाच्या भरात राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे आणि माजी आ. जयप्रकाश मुंदडा यांच्या कडून अनावधानाने निंदनीय प्रकार घडला याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले होते यामुळे देश आणि राज्यभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या . तसेच पोलिसांनी दंडेलशाही करत सहभागी झालेल्या शिवप्रेमी शिवभक्तांवर आणि शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले. मिरवणुकीनंतर झालेल्या प्रकारामुळे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पावित्र्य मालिन झाले असल्याची भावना जिल्हाभरातील शिवप्रेमी, शिवभक्तांनी बोलून दाखवली यामुळे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पावित्र्य अबाधित राहावे याकरिता खासदार हेमंत पाटील आणि शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. संतोष बांगर हे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील गोदावरी, आसना, पूर्णा, कयाधु, पैनगंगा या पंचनद्यांच्या जलाने जलाभिषेक करणार आहेत.

या जलाभिषेक सोहळ्याला हिंगोली जिल्ह्यातील तमाम शिवभक्त शिवसैनिक आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने वसमत येथे सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात उपस्थित राहावे असे आवाहन खासदार हेमंत पाटील आणि आ. संतोष बांगर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या