मुस्लिम म्हणजेच इस्लाम धर्माचे अनुयायी ईद-ए-मिलाद-उन-नबी हा सण दरवर्षी साजरा करतात. इस्लामच्या अनुयायांसाठी या दिवसाचे महत्त्व यासाठी आहे, की या दिवशी इस्लामचे शेवटचे पैगंबर हजरत मुहम्मद यांचा जन्म झाला होता आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यूही झाला असे मानले जाते.
ईद-ए-मिलाद-उन्-नबी सणाला ईद-ए-मिलाद किंवा माउलीद असेही म्हणतात. भारतामध्ये तसेच जगातील अनेक देशांमध्ये, मुस्लिम समाजातील लोक मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी पैगंबर मुहम्मद यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुका काढल्या जातात. इस्लाम दिनदर्शिकेच्या तिसऱ्या महिन्यात ईद-ए-मिलाद-उन-नबी हा सण जगभरात साजरा केला जातो. प्रत्यक्ष मोहम्मद पैगंबर यांनी इस्लाम धर्मात कोणताच एक विशीष्ट पंथ दिला नसला तरी नंतर सुन्नी आणि शिया पंथ पडले आणि हे पंथ अनेक भागात वेगवेगळ्या दिवशी ईद-ए-मिलाद-उन्-नबी हा सण साजरा करतात.
ईद-ए-मिलाद-उन-नबीचा थोडक्यात इतिहास (History of Eid-e-Milad)
प्रेषित मुहम्मद यांचा जन्म इस्लामिक कॅलेंडरच्या तिसऱ्या महिन्याच्या 12 व्या दिवशी मक्का, सौदी अरेबीया या ठिकाणी झाला. इस्लामिक श्रद्धेनुसार, पैगंबरांचा जन्म 570 ई मध्ये झाला आहे. असे म्हटले जाते की ईद-ए-मिलादचा पहिला सण इजिप्तमध्ये साजरा केला गेला. त्याच वेळी 11 व्या शतकाच्या आगमनानंतर, ते जगभरात साजरे केले जाऊ लागले. मुहम्मद पैगंबर यांचा मृत्यू मदिना येथे इंग्रजी महिन्यानुसार 8 जून 632 रोजी झाला. त्यांचे पुर्ण नाव अबू अल-काशीम मुहम्मद इब्न अब्द अल्लाह इब्न अब्द अल-मुत्तालीब इब्न हासिम ( Abū al-Qāsim Muḥammad ibn ʿAbd Allāh ibn ʿAbd al-Muṭṭalib ibn Hāshim) असे आहे. त्यांना इस्लाम धर्माचे संस्थापक समजले जात असले तरी त्यांचेपुर्वीच इस्लाम धर्म अस्तित्वात होता आणि ते शेवटचे प्रेषीत होते, असे मुस्लिम मानतात.
ईद-ए-मिलाद-अन-नबीचे महत्त्व (Importance of Eid-E-Milad-Un-Nabi)
प्रत्यक्ष प्रेषीत मुहम्मद यांचा जन्मदिवस असल्याने ईद-ए-मिलाद-उन्-नबीच्या विशेष प्रसंगी, मिरवणुका काढल्या जातात आणि मशिदींमध्ये नमाज अदा केली जाते. या दिवशी मशिदी विशेष सजवल्या जातात आणि धर्मग्रंस्थ कुराणचे पठण केले जाते. त्याचबरोबर मोहम्मद साहेबांचे संदेश समाजात पसरवले जातात. या विशेष प्रसंगी, पारंपारिक स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात आणि गरिबांमध्ये वितरित केले जातात. असे मानले जाते की या विशेष प्रसंगी, जकात दान आणि दान करून अल्लाह प्रसन्न होतो, कुटुंबाला आशीर्वाद मिळतो. समाजाला दिशा देणारा, इस्लामचा खरा अर्थ शांती असल्याने या दिवशी एकमेकांमध्ये प्रेम, जिव्हाळा निर्माण करण्याचा हा सण मानला जातो.
अत्यंत मोजक्या शब्दात महत्वपूर्ण माहिती प्रदान केल्याबद्दल मनापासून धन्यवाद
उत्तर द्याहटवा