शाहू नगर भागात रस्त्यांची कामे त्वरीत सुरू करण्यात येणार !

मुख्याधिकारी डॉ. कुरवाडे यांच्या आश्वासनानंतर नागरीकांचे आंदोलन स्थगित

हिंगोली: शहरातील छत्रपती शाहू नगर, प्रगती नगर, वैद्य नगर, सम्राट नगर आदी भागात कच्चे रस्ते सुद्धा नसल्याने नागरीकांची मोठी हेळसांड होत आहे. या भागात किमान कच्चे रस्ते तरी द्यावेत, नाल्या तयार कराव्यात अशी मागणी या भागातील नागरीकांच्या वतीने निवेदनाद्वारे करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. नगर परिषद प्रशासन उपायुक्त, नगर परिषद मुख्याधिकारी यांनी कामे सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने नागरीकांच्या वतीने सुद्धा नगर परिषदेच्या विरोधात करण्यात येणारे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

शहरातील छत्रपती शाहू नगर, प्रगती नगर, वैद्य नगर, सम्राट नगर, कुशी नगर आदी भाग नगर परिषदेचा भाग असूनही या भागात नगर परिषदेच्या वतीने रस्ते, नाल्यांची कामे करण्यात आली नाहीत. त्याउलट अनेक भागात मानवी वस्ती नसूनही पक्के रस्ते तयार करण्यात आले आहेत. स्थानिक नगर सेवकांकडून या भागातील नागरीकांवर हेतूपुरस्सर अन्याय करण्यात येत असल्याने नागरीकांमध्ये तिव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. याबाबत 28 ऑगस्ट रोजी नागरीकांच्या वतीने नगर परिषदेला निवेदन देण्यात आले होते. तर नागरीकांच्या मागण्याना आझाद समाज पार्टी, वंचित बहूजन आघाडीच्या वतीने पुर्ण पाठिंबा देण्यात येवून आंदोलनात सक्रीय सहभागी होण्याचे निश्चित केले होते. तर 2 सप्टेंबर रोजी नगर परिषद प्रशासन विभागाचे उपायुक्त रामदास पाटील, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी या भागातील कामे ताबडतोब सुरू करण्याचे आश्वासन देवून आंदोलन न करण्याचे आवाहन केले होते.

तसेच 5 सप्टेंबर रोजी नगर परिषदेचे अभियंता विजय इटकापल्ले यांनी या भागात येवून प्रत्यक्ष भेट देवून रस्त्याच्या दुरावस्थेची पाहणी केली. त्यानुसार आज नागरीकांच्या वतीने नगर परिषदेला लेखी निवेदन देवून आंदोलन काही काळासाठी स्थगित करण्याचे आश्वासन देण्यात आले. निवेदनावर वंचित आघाडीचे रमेश ठोके, भगवान गायकवाड, आझाद समाज पार्टीचे जिल्हाप्रमूख अ‍ॅड. रावण धाबे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सरचिटणीस रविंद्र वाढे, आझाद समाज पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. सचिन पट्टेबहादुर, वंचित आघाडीचे जिल्हा सचिव ज्योतीपाल रणवीर, आझाद समाज पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. मारोती सोनुले, वंचित आघाडीचे शहराध्यक्ष अतिकूर रहेमान या भागातील नागरीक पत्रकार सुधाकर वाढवे, फेरोज पठाण आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या