३० लाख रुपये किमतीचा मांडूळ साप दहशतवाद विरोधी पथकाकडून जप्त

हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यातील येळी फाटा शिवारातून दहशतवाद विरोधी पथकाने शुक्रवारी दि.१० रोजी दुपारी ३० लाख रुपये किमतीचे मांडूळ जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे. तर मांडूळ पुढील कारवाईसाठी वन विभागाच्या हवाली केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येळी फाटा शिवारात मागील काही दिवसांपासून परभणी जिल्ह्यातील दोघेजण मांडूळ विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाला मिळाली होती. यावरून आज पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, जमादार धनंजय पुजारी, महेश बडे, शेख शफीउद्दीन, अर्जुन पडघन, विजय घुगे यांनी आज दुपारी दोन वाजता येळी फाटा शिवार गाठले.

यावेळी साध्या वेशात असलेल्या पोलिसांनी परभणी जिल्ह्यातील कौडगाव येथील गौतम सपाटे व अविनाश सपाटे यांच्याकडे मांडूळ खरेदी करण्यासाठी आल्याचे सांगितले. त्यानंतर या दोघांनी साध्या वेशातील पोलिसांना व्यापारी समजून येळी शिवारात नेऊन मांडूळ दाखवले. या मांडूळांची वजन तीन किलो ६०० ग्रॅम भरले. तर त्याची लांबी चार फूट होती. त्यांनी या मांडूळाची किंमत ३० लाख रुपये सांगितली. यावेळी दहशतवाद विरोधी पथकाने आपण व्यापारी नसून पोलिस असल्याचे सांगत दोघांनाही ताब्यात घेतले. या प्रकाराची माहिती औंढा नागनाथ पोलीस ठाणे व वन विभागाला दिली.

औंढानागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांचे पथक तसेच वन विभागाचे कर्मचारी सय्यद घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मांडूळ ताब्यात घेतले. सदर मांडुळ मागील काही दिवसापासून दोघांच्या ताब्यात असावे अशी शक्‍यता वनविभागाने व्यक्त केली असून त्याची किंमत सुमारे ३० लाख रुपये असल्याची स्पष्ट केले या प्रकरणी दोघांवर कारवाईची प्रक्रिया सुरू होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या