बिम कंपनीसोबत खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने करार...
हिंगोली: हळद उत्पादनात महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या पाठोपाठ हिंगोली जिल्हा सुद्धा आघाडीवर आहे. जिल्ह्यातील हळदीला जागतिक बाजारपेठ मिळावी या उद्देशाने खासदार हेमंत पाटील यांनी पुढाकार घेतला असून हळदीचे सौंदर्यप्रसाधने , औषध निर्मिती आणि इतर प्रक्रिया उद्योगामध्ये मागणी वाढावी याकरिता देशातील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) यांच्या अंतर्गत असलेल्या बीम (BEAM) या कंपनी सोबत हिंगोली जिल्ह्यातील सूर्या व तुकाई फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्यासोबत पॅकिंग , ग्रेडिंग आणि आद्यवत तंत्रज्ञानाने साठवणूक करण्यासाठी करार करण्यात आला आहे.
तसेच शेतकऱ्यांना तात्काळ परतावा मिळावा यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभी करण्यासंदर्भात गोदावरी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप या वित्तीय संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून होणाऱ्या करारामुळे जागतिक बाजारपेठेत हिंगोली जिल्ह्याच्या हळदीला मागणी वाढून उत्पादन ही वाढणार आहे.यावेळी बीएसई चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान, बीम (बी.ई. ए. एम) चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिन्हा, बीएसई चे मुख्य व्यवसाय अधिकारी (CBO) समीर पाटील, मुख्य नियामक अधिकारी (CRO) नीरज कुलश्रेष्ठा, उपमहाव्यवस्थापक पिनाकीन दवे,रुद्र हेमंत पाटील यांची उपस्थिती होती.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हि जगातील सर्वात मोठी आणि वेगाने एक्सचेंज घडवून आणणारी कंपनी आहे . बीएसई हा आशिया खंडातील प्रथम स्टॉक एक्सचेंज आणि सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन कायद्यांअंतर्गत कायम मान्यता मिळालेला देशातील पहिला स्टॉक एक्सचेंज आहे . गेल्या १३३ वर्षांत प्रतिष्ठेची दिवसेंदिवस यामध्ये वाढ झाली आहे. आपल्या देशात नियमित लागवड केली जाणारी हळद ही खाद्य आणि मसाल्याच्या पदार्थांमध्ये वापरली जाते, त्या अनुषंगाने आपण या पिकाची आजवर लागवड करत आलो आहोत. मात्र परदेशांमध्ये हळदीचा औषधासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मोठमोठ्या औषधी कंपन्या हळदीवर अनेक प्रयोग करत आहेत . त्यांच्या मागणीप्रमाणे आपल्याकडच्या हळदीच्या लागवड पीक पद्धतीमध्ये बदल करून उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. महाराष्ट्र मध्ये सांगली जिल्हा हळद लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. त्याखालोखाल आता हिंगोली जिल्हा सुद्धा हळद उत्पादनात आघाडीवर येत आहे. हिंगोली येथे हळद संशोधन प्रक्रिया महामंडळ स्थापन करण्यास राज्य सरकार ने अनुमती दिली असून त्यासाठीची अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे , त्या अभ्यास समितीवर हिंगोली चे कर्तव्यदक्ष खासदार हेमंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
खासदार हेमंत पाटील यांनी या संदर्भाने हिंगोली जिल्ह्याच्या हळदीला जागतिक बाजारपेठेत कशाप्रकारे स्थान मिळेल यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असून नुकतेच त्यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE ) यांच्या सहयोगी बीम या कंपनीसोबत हळदीच्या ग्रेडिंग,पॅकिंग आणि गोदामातील साठवणुकीमध्ये अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या उद्देशाने सुसूत्रता येण्यासाठी करार केला आहे. सोबतच शेतकऱ्यांना पिकाचा तात्काळ परतावा मिळावा यासाठी सुद्धा करार करण्यात आलेला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अधिकारी आणि खासदार हेमंत पाटील यांच्यामध्ये नुकतीच एक बैठक पार पडली. त्यानंतर बोलताना खासदार हेमंत पाटील म्हणाले की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सोबत करार होणे ही मानाची बाब समजली जाते . हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या वाढत्या उत्पादनाला घेऊन . बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ने करार करण्यास पुढाकार घेतला आहे . ग्रेडिंग केलेल्या हळदीला उद्योगामध्ये सौंदर्यप्रसाधने आणि औषधी निर्मितीमध्ये मोठी मागणी आहे.या हळदीला बीएसईच्या बीम या कंपनीद्वारे भारत देशात व आंतरराष्ट्रीय बाजारपेठत संधी मिळावी यासाठी हळदीची पॅकिंग, ग्रेडिंग आणि गोदामातील साठवणूक यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे सुधारणा घडवून आणण्यात येणार आहे. याकरिता हिंगोली जिल्ह्यातील सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनी व तुकाई फार्मर प्रोड्यूसर कंपनी या दोन कंपन्यांची निवड करण्यात आली असून, लवकरच याबाबतचे कामकाज सुरू करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना हळदीच्या उत्पादनाचा तात्काळ परतावा मिळावा यासाठी रियल टाइम पेमेंट (RTP)यामध्ये अत्याधुनिक यंत्रणा उभी करण्यासाठी येथील गोदावरी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप या वित्तीय संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. यामुळे हिंगोली जिल्ह्यातील हळदीला आता जागतिक बाजारपेठेत मानाचे स्थान मिळणार आहे , यात दुमत नाही . त्यामुळे जिल्ह्यातील हळदीच्या उत्पादनात ही वाढ होऊन हिंगोली जिल्हा हळद उत्पादन आणि लागवडीच्या बाबतीत जगाच्या नकाशावर अधोरेखित होणार आहे. भारतामध्ये हळद उत्पादनासाठी भौगोलिकदृष्ट्या अनुकूल वातावरण असल्यामुळे हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते .
हिंगोली जिल्ह्यात सुद्धा हळद उत्पादनासाठी भौगोलिक दृष्ट्या अनुकूल वातावरण असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने हिंगोली जिल्ह्यात हळद संशोधन प्रक्रिया महामंडळ स्थापण्यास अनुमती दिली आहे त्याच अनुषंगाने आता हिंगोली जिल्ह्यातील हळदीला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी पुढाकार घेतला असून त्या दृष्टीने आता नवनवीन प्रयोग करणे सुरू आहेत त्याच अनुषंगाने हळदीच्या नवनवीन संकरित बेणे द्वारे आणि नव्या लागवड पद्धती द्वारे हळदीची लागवड करून उत्पादन वाढविले जाणार आहे.