नातवाचे तोंड पाहण्यापुर्वीच पती-पत्नी भिषण अपघातात ठार

मयत कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव येथील.....

पुसद: नुकत्याच जन्मलेल्या नातवाला पाहण्यासाठी जात असलेल्या पती-पत्नीवर काळाने घाला घातला. मयत झालेले दांपत्य हे कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर जवळील येहळेगांव येथील असून अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिल्याने हा अपघात झाला असून अपघातातील महिलेच्या शरीराच्या चिंध्याचिंध्या झाल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूर- तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी ९:०० वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत. कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर जवळील येहळेगांव येथील मोहन भगाजी टेकाळे (६५) आणि त्यांची पत्नी अनुसया (६०) अशी मयतांची नावे आहेत. उमरखेड येथे रुग्णालयात सुनबाईची प्रस्तुती झाल्याने नातू पाहण्यासाठी दोघे पती-पत्नी त्यांची मोटारसायकल क्रमांक (एमएच २९ बीजे ३८०६) वरून महागाव भागातील सवना येथून जात होते. मुडाणा ते बिजोरा दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जबर धडक दिली. या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले आहे असून या भीषण अपघातात अनुसयाबाई यांचे संपूर्ण शरीर छिन्नविछिन्न झाले.

महागाव पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोस, बीट जमादार शरद येडतकर, नारायण पवार, गजानन राठोड यांचे पथक सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला असून सोना येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या  अज्ञात वाहन आणि चालकाचा पोलिस शोध घेत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या