हिंगोली शहरात सुरू होत आहे विद्युत शवदाहिनी

मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी केली पाहणी

हिंगोली: शहरातील कयाधू नदी परिसरातील स्मशानभूमी येथे सुरू असलेल्या विद्युत शवदाहिनीच्या कामाची मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी आज १९ जून रोजी अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी अतुल जैस्वाल, शेख अखिल उपस्थित होते.

सदर बांधकाम हे जिल्हा वार्षिक योजनेतून केली जात असल्याचे ते यावेळी म्हणाले. शवदाहिनी विद्युत आणि गॅस कंबाईन आहे. संसर्गजन्य रोगांनी ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या पार्थिवावर याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या विद्युत शवदाहिनीमध्ये एक शव जाळण्यास अंदाजे वीस मिनिटाचा वेळ लागतो. सदर बांधकाम जवळपास पूर्ण झाले असून शवदाहिनीच्या कामाला आठवडाभर लागू शकतो, असे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी यावेळी सांगितले. 

विशेष म्हणजे येथील स्मशानभूमीत घनवन प्रकल्प राबविला जात असून परिसरात जवळपास १८०० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे, यासह याठिकाणी विविध सुविधा करण्यात आल्या आहेत. या विद्युत दाहिनीमुळे मोठ्या प्रमाणात लाकडांची बचत होणार आहेच; शिवाय अंत्यविधी पूर्ण होण्यासाठी सुद्धा वेळ लागणार नाही. कोरोना काळात हिंगोली शहरातील सर्व स्मशानभूमीमध्ये दररोजच अंत्यसंस्कार करण्यासाठी गर्दी दिसून येत होती. त्यात लाकडे आणि इतर खर्च असा अंत्यविधीचा एकूण खर्च सुमारे ५ ते ८ हजाराच्या दरम्यान जात होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या