कळमनुरी आखाडा बाळापूर येथील नारायणराव वाघमारे महाविद्यालयातील प्राध्यापिका तथा कवयित्री, ललित लेखिका प्रा. संध्या रंगारी यांच्या ललितकथेचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , पुणे च्या पदवी अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.
निवडक 10 नामवंत लेखकांच्या यादीत एकमेव ग्रामीण लेखिका, कवयित्री यांच्या साहित्याचाही समावेश करण्यात आल्याने हिंगोली जिल्ह्याच्या साहित्यवर्तुळात आणखी एक मानाचा तुरा गोवण्यात आला आहे.
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे येथील विश्वविख्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,पुणे च्या पदवी अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे .बी.ए. द्वितीय वर्षाच्या मराठी अभ्यास पुस्तकाची निर्मिती करण्यात आली असून मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिरीष लांडगे ,सदस्य प्रा. डॉ. दिलीप पवार , प्रा. डॉ. जया कदम यांनी संपादित केलेले ' साहित्यरंग ' हे द्वितीय सत्राचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे .पुणे येथील अक्षरवाड्.मय प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक प्रकाशित झाले असून निवडक 10 नामवंत मराठी साहित्यिकांच्या ललितकथा यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
या मान्यवरांच्या सोबत मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर या ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या नारायणराव वाघमारे महाविद्यालय येथील कवयित्री, ललित लेखिका प्रा. संध्या रंगारी यांच्या ललितकथेचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या ' चांदणचुरा ' या ललितगद्य संग्रहातील ' पाखरं ' ही ललितकथा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे .पुणे विद्यापीठासारख्या नामवंत विद्यापिठात प्रा. संध्या रंगारी यांचे साहित्य विद्यार्थ्यांना शिकविले जाणार आहे. या निवडीमुळे हिंगोली जिल्ह्यातील साहित्यवर्तुळात आणखी एक मानाचा तुरा गोवण्यात आला आहे .प्रा.संध्या रंगारी यांचे ' चांदणचुरा ' हे ललितगद्याचे पुस्तक यापूर्वी महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ ,बडोदा ,गुजरात येथे पदवी अभ्यासक्रमासाठी तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी समाविष्ट केले होते. याशिवाय मुंबई विद्यापीठ, मुंबई , डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ,औरंगाबाद येथेही पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कवितांची कवितांचा समावेश करण्यात आला होता. केरळ येथील महात्मा गांधी विश्वविद्यालयात त्यांच्या हिंदी कवितांचा समावेश पदव्युत्तर अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात शिक्षणाचे माहेरघर ओळखल्या जाणाऱ्या व मानबिंदू असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,पुणे येथेही त्यांच्या ललित कथेचा समावेश अभ्यासक्रमात झाल्याने त्यांच्या साहित्यातील दर्जावर पुणेरी मोहर उमटली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. कृष्णराव पाटील जरोडेकर, प्रभारी प्राचार्य डॉ. सुधाकर इंगळे , प्रा. डॉ. अनंत राऊत यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ग्रामीण भागात अध्ययनाचे काम करूनही सकस साहित्य निर्मिती करणाऱ्या प्रा. संध्या रंगारी यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.