हिंगोली:- येथील शिवाजीनगर स्थित गणराज शॉपी मध्ये दिनांक 14 मे रोजी सकाळच्या सुमारास भारतामध्ये आढळणाऱ्या नाग या प्रजातीचा साप आढळला. साप दिसल्यानंतर तेथील व्यक्तींनी सर्पमित्र विशंभर पटवेकर यांना लगेच बोलून घेतले व त्यांनी हा साप सुरक्षित रित्या पकडला.
उंदीर खाण्याच्या उद्देशाने हा साप शॉपी मध्ये शिरला असावा असे त्यांनी यावेळी सांगितले.सर्पमित्र पटवेकर यांनी मागील आठवड्यात सुध्दा अकोला बायपास ,शिक्षक काॅलनी या ठिकाणी एका किराणा दुकाना जवळच नाग प्रजातीचा साप पकडून त्याला जीवदान दिले होते. मागील काही दिवसां पासून वातावरणातील बदल हा सापांना त्यांच्या बिळातून बाहेर पडण्यास भाग पाडत आहे. सध्या पावसाचे वातावरण व गर्मीचा उकाडा यामुळे साप तसेच उंदीर आपल्या बिळातून बाहेर पडतात,त्यामुळे मागील एक दोन आठवड्यापासून साप निघण्याच्या बऱ्याच घटना शहरात घडत आहेत.अशा सापांना न मारता सर्पमित्रांना बोलवावे असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.सर्पमित्र पटवेकर हे कोरोना सारख्या महामारी चा काळातही जिवाची पर्वा न करता निसर्गाचे संतुलन राखताना दिसत आहेत. त्यांनी पकडलेल्या सापांना सुरक्षितरित्या जंगलामध्ये सोडून देण्यात येते असे त्यांनी यावेळी सांगितले.