सामाजिक आणि नैतिकदृष्ट्या अस्विकार्य असल्याचे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे निरीक्षण....
एका याचिकेवर निकाल देताना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने, लाइव्ह-इन रिलेशनशिप (लग्न न करताच अविवाहीत जोडप्याने सोबत राहणे) सामाजिक आणि नैतिकदृष्ट्या अस्वीकार्य असल्याने या जोडप्याला त्यांच्या नातेवाईकापासून धोका असला तरी पोलिस संरक्षण देण्यास नकार दिला आहे.
गुलजा कुमारी विरुद्ध पंजाब राज्य या प्रकरणात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने हे मत व्यक्त केले आहे. दाखल केलेल्या याचिकेत नमूद केले होते की, त्या जोडप्याला त्यांच्या पालकांकडून धोका आहे. गुलजा कुमारी आणि गुरविंदरसिंग हे जोडपे गेल्या काही दिवसांपासून सोबत राहत असून त्याना त्यांच्या पालकांकडून धोका निर्माण झाला आहे. आपण दोघेही भविष्यात लग्न करणार असून न्यायालयाने तसे संरक्षण द्यावे अशी विनंती केली होती. त्यावर एक सदस्यीय न्यायपीठाचे न्यायाधीश न्या. एच. मदान यांनी लिव्ह इन रिलेशनशिप समाजिक आणि नैतिक नाही, त्यामूळे त्यांना कोणतेही संरक्षण आदेश संमत केले जाऊ शकत नाहीत असे मत नोंदले आहे.