अन्नपुर्णाबाईचा संघर्ष पाहून तुम्हीही म्हणाल, अशी परिस्थीती येवू नये कुणाच्याही वाट्याला....

भिंत खचली चूल विझली होते नवते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले... असे काहीसे जिवन गाणे झालेल्या या मायमावलीच्या साहसाचे, जगण्याच्या उमेदीचे शब्दान्मध्ये वर्णन करणे शक्यच नाही. तिचा संघर्ष पाहिल्यानंतर, तुम्हीही म्हणाल की अशी दयनीय, करूण परिस्थीती येवू नये कुणाच्याही वाट्याला........
आपल्या दोन्ही मानसिक अपंग मुलांसह अन्नपुर्णाबाई
अन्नपूर्णा यादूजी धुळे (५२ वर्षे) असे या साहसी महिलेचे नाव आहे. अन्नपूर्णाबाई धुळे या गेल्या सुमारे ३० वर्षांपासून औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे कुडाण आणि पत्राच्या घरात राहतात. त्यांचे लग्न पुसद तालुक्यात झाले होते. पतीच्या निधनानंतर सासरच्या लोकांनी हात वर केल्यानंतर त्या आपले माहेर पिंपळदरी येथे दोन मुलांसह आल्या. मोठा मुलगा राहूल आणि छोटा देविदास या दोघांसह पिंपळदरी येथे आल्यानंतर येथेही त्यांना कोणी जवळचे नातेवाईक नाही. वडील अगोदरच वारल्याने माहेरगाव हाच काय तो पिंपळदरीतील मायेचा ओलावा.

आपल्या दोन मुलांना जगविण्यासाठी, त्यांना शिकून मोठे करण्यासाठी, तेच आपल्या म्हातारपणात आपली काठी होतील म्हणून अत्यंत साहसाने मिळेल ते काम करून त्यांचे पालन पोषण सुरु केले. परंतु नियतीला हे मान्य नसावे. कारण अन्नपूर्णाबाई यांचे दोन्ही मुले मतिमंद निघाली. मोठा मुलगा राहूल (२७ वर्षे) आणि छोटा देविदास (२५ वर्षे) या दोघांमध्ये केवळ दोन वर्षांचे अंतर आहे. आपला मोठा मुलगा मतीमंद असल्याची चाहूल लागताच हताश झालेल्या अन्नपुर्णाबाईना काही कालांतराने लहान मुलगाही मतीमंद असल्याचे समजले. आणि दोन्ही लेकरांचे आपल्यानंतर काय होईल? हा एकच प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिला. लेकरे मोठे झाल्यावर म्हतारपणात आधार होतील, जिवनभराची जगण्याची धावाधाव थांबेल ही आशा त्यांच्यासाठी केवळ स्वप्न होवून बसले आहे. असे असले तरी त्यांनी, राहूल आणि देविदास या दोन मुलांना बरे करण्यासाठी, त्यांना सामान्य जिवन जगता यावे यासाठी त्यांच्यावर उपचार सुरु केले. अकोला येथील मनोविकार तज्ञाकडे त्यांच्यावर उपचार अन्नपुर्णाबाई करीत आहेत. त्यांच्या उपचारावर प्रती महिना ३ हजार रुपये खर्च त्या करतात. या मुलाना महिन्याचे औषधी मिळाली नाही तर, आक्रमक होवून ते दिवसरात्र जोरजोरात ओरडतात. आपल्या मुलांमूळे लोकांना त्रास नको म्हणून आणि मुलांचे व्याकूळ चेहरे पाहवत नसल्याने अन्नपुर्णाबाई वाट्टेल ते करुन महिन्याची औषधी आणतातच.
आपल्या मुलाचे केस कर्तन करतांना अन्नपुर्णाबाई....
शिवाय या दोन्ही मुलांची सेवासुश्रुषा त्याच करतात. त्यांना अंघोळ घालणे, त्यांची दाढी, केस कटींग करणे, कधी कधी त्यांना प्रात:विधीसाठी नेणे, त्यांची स्वच्छता राखणे ही सर्व कामे त्याच करतात. आपले जगणे शक्य व्हावे, मुलांचा महिन्याचा औषधाचा खर्च भागावा यासाठी, अन्नपुर्णाबाई आजपर्यंत भिक न मागता, नाल्या साफ करण्यापासून ते शेतात अंगमेहनतीचे मिळेल ते काम करीत आल्या आहेत. या कामाच्या व्यापात त्यांचा गावातील लोकांशी संपर्क नसल्यात जमा असून आपले स्वमग्न जिवन जगत आहेत. दोन मुलेच आपले विश्व होवून बसलेल्या अन्नपुर्णावबाई यांना, मात्र आता त्यांच्या वृध्दापकाळाचीही जाणीव होत आहे. स्वत:च्या वृध्दापकाळापेक्षा त्यांना, चिंता आहे ही की, आपल्या नंतर आपल्या मुलांचे काय होईल?

याप्रसंगी कवी कुसूमाग्रज यांच्या काव्यपंक्ती आठवतात. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा... अन्नपुर्णाबाई आजही त्या खंबीर आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांना दुरुस्त करण्यासाठी समाजातून मदत व्हावी अशी अपेक्षा आहे. हीच मदत त्यांच्यासाठी पाठीवर थाप असेल., हे मात्र खरे !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या