हिंगोलीकरांसाठी काळा दिवस... जिल्हा स्तब्ध, अश्रू अनावर...

हिंगोली:- हिंगोली जिल्ह्याचे तरुण तडफदार नेते, काँग्रेसचे राज्यसभा खासदार, राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू ॲड. राजीव सातव यांचे निधन झाल्याची बातमी सकाळी सकाळीच हिंगोलीत धडकताच जिल्ह्यातील त्यांच्या प्रियजनांना अश्रू अनावर झाले. राष्ट्रिय पातळीवर गेलेला एक मोठा नेता गमावल्याने हिंगोलीकरांसाठी हा खरंच काळ दिवस ठरला असून राजीव सातव आपल्यातून निघून जाणार नाहीत असा दृढ विश्वास असलेल्या हिंगोलीकरांना नियतीने शेवटी मोठा दगाफटका केला. या दुःखा चे वर्णन कसे होणार? आज त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता, नेता एकमेकांकडे निर्विकार पाहून केवळ ढसाढसा रडत असून, साहेब तुम्ही सोडून जायचे नव्हते.... हेच शब्द निघत आहेत.
२१ सप्टेंबर १९७४, या दिवशी जन्मलेले राजीव सातव हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातील मसोड येथे सरपंच झाले. सरपंच ते कळमनुरी पंचायत समिती सभापती, त्यानंतर जिल्हा परिषदेत शिक्षण व कृषी सभापती. त्यानंतर कळमनुरी विधानसभेचे आमदार, त्यानंतर हिंगोली लोकसभेचे खासदार आणि त्यानंतर राज्यसभेच्या माध्यमातून खासदार.... असा त्यांचा राजकीय आलेख दिवसेंदिवस वाढत गेला होता. 
कळमनुरी येथे १७ रोजी अंत्यविधी....

पुणे येथे जहाँगीर रुग्णालयात आज 16 मे 2021 रोजी सकाळी 5 वाजता त्यांचे निधन झाले असून राजीव सातव यांची कर्मभूमी, जन्मभूमी असलेल्या कळमनुरी येथे त्यांचा अंत्यविधी होणार आहे. उद्या दि. १७ मे सोमवार रोजी सकाळी १० वाजता होणार.  दिवंगत खासदार राजीव सातव यांचे पार्थिव हेलिकॉप्टर ऐवजी ॲम्बुलन्सद्वारे कळमनुरीत दाखल होणार आहे. त्यानंतर अंत्यविधी होणार आहे. त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठा जनसागर येण्याची शक्यता आहे. मात्र कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या अनेक चाहत्यांना मुकावे लागू शकते.
अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष या पदापर्यंत मजल मारल्यानंतर त्यांनी संपूर्ण भारतात आपला चाहतावर्ग तयार केला होता. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रमुखपद सांभाळत असतानाच त्यांनी काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्याशी स्वकर्तुत्वाने जवळीक निर्माण केली आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय राजकारणात कधीच मागे वळून पाहिले नाही. 
सातव यांचे मूळ गाव मसोड (ता. कळमनुरी) येथे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी, दिनांक १६ फेब्रुवारी २०१७ रोजी पत्नी डॉ. प्रज्ञा सातव त्यांच्यासह रांगेत उभे असतानाचे छायाचित्र...
हिंगोलीसारख्या अत्यंत मागास जिह्यातील एक तरुण नेता मराठवाडा, महाराष्ट्र ते थेट राष्ट्रीय पातळीवर आपला आपल्या कार्याचा ठसा उमटवत असतानाच त्यांना कोरोना रोगाची कधी लागण झाली हे कळलेच नाही आणि २०-२१ दिवसांपूर्वी ते पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. उपचारादरम्यान एकदा त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक झाली असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर हिंगोलीकरांच्या हृदयात तेव्हाच धस्स झाले होते. 

संसदेत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेण्याच्या वेळी आपल्या मुलासह....
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची प्रकृती अत्यंत ठणठणीत असून ती लवकरच बरे होतील अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे हिंगोलीकरांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य उमलले आणि साहेब लवकरच बरे होवून काही दिवसातच घरी परतून आपल्या कार्यात पुन्हा व्यस्त होतील अशी अपेक्षा चाहत्यांना होती. असे असताना त्यांच्या शरीरात सायटोमॅजिलो नावाचा नवीन व्हायरस असल्याचे वृत्त राज्याच्या आरोग्य आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घोषित केले. आणि त्यानंतर पुन्हा काय होते आणि काय नाही, या एकाच चिंतेने हिंगोलीकर स्तब्ध झाले होते. 
राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना ॲड. राजीव सातव....
ते या दुःखातून सहिसलामत बाहेर पडोत यासाठी प्रत्येक जातीधर्माचा व्यक्ती आपापल्या पद्धतीने त्यांच्यासाठी आशीर्वाद मागत होता, दुवा मागत होता, मंगल कामना व्यक्त करीत होता. परंतू, या चिंतेतच नको व्हायचे तेच झाले आणि राष्ट्रीय राजकारणातील एक बलाढ्य नेता निघून गेला. त्यांच्या निधनाने केवळ केवळ हिंगोली जिल्ह्याचीच नाही तर सबंध महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अत्यंत कमी वयात राजकारणातील यशोशिखरे पादाक्रांत करणाऱ्या या अत्यंत मोठ्या, महानेत्याला आपण मुकलो आहोत अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे.
मातब्बर बहुजन नेता.....
राजीव शंकरराव सातव यांचा (21 सप्टेंबर 1974- 16 मे 2021) यांनी 2009 मध्ये कळमनुरी विधांनसभा निवडूक जिंकून राज्य आणि देशाच्या संसदीय राजकारणात सक्रीय पाऊल टाकले. 2014 मध्ये 16 व्या लोकसभा निवडणूकीत त्यानी विजय मिळवून देशाच्या संसदेत पाऊल टाकले. 2020 मध्ये राज्यसभा निवडणूकीत महाराष्ट्र राज्यातून निवडून गेले. सभागृहातील उपस्थिती, सभागृहात मांडलेले प्रश्न आदी कामांची दखल घेत त्यांना चार वेळा संसदरत्न पुरस्कार सुद्धा देण्यात आला होता. एमआयटी, पुणे या संस्थेच्या वतीने त्याना 2018 मध्ये ‘भारत अस्मिता जन प्रतिनिधी श्रेष्ट’ हा पुरस्कार सुद्धा देण्यात आला होता. ते कॉन्ग्रेस पक्षाचे गुतराज प्रभारी, पक्षाचे कायमस्वरुपी निमंत्रक होते. देशपातळीवर एक मोठा बहुजन नेता म्हणून त्यांनी स्वकर्तृत्वाने ओळख निर्माण केली होती..


त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...अखेरचा जय भीम.... जय भारत.... जय महाराष्ट्र!

Post a Comment

0 Comments