खासदार सातव यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

हिंगोली: कॉन्ग्रेस नेते खासदार राजीव सातव यांच्या पार्थिवावर आज अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात आज सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानाजवळ खुल्या मैदानात येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 
सातव यांच्या निधनाची वार्ता समजताच कालपासूनच त्यांच्या कळमनौरी येथील निवासस्थानी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. अंत्यविधीला राज्यस्तरीय, स्थानिक नेते, मंत्री मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजीव सातव यांचे पार्थिव असलेल्या अ‍ॅम्ब्यूलंसवर पुणे ते कळमनुरी या मार्गावर ठिकठीकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. रात्री ८ वाजता खासदार राजीव सातव यांचे पार्थिव कळमनुरी येथे पोहचताच प्रतिक्षेत असलेल्या असंख्य कार्यकर्त्याना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी एकमेकांच्या गळ्यात पडून आपल्या भावनाना वाट मोकळी करून दिली. राजीव सातव यांची आई रजनीताई सातव, पत्नी डॉ. प्रज्ञा सातव, मुलगा, मुलगी आणि जवळचे नातेवाईक पार्थिवाजवळ बसून होते. त्यांच्या दोन्ही लहान मुलांचे रडणारे निरागस चेहरे पाहून अंत्यदर्शनासाठी आलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावत होते.
राहूल गांधी, प्रियंका गांधी यांच्यातर्फेही पुष्पचक्र अर्पण....
अंत्यविधी कार्यक्रमाला कॉन्ग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी, प्रियंका गांधी हे, सुरक्षा कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. परंतू राहूल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी दिलेल्या सूचनेनुसार, त्यांच्या वतीन कॉन्ग्रेस नेत्यानी राजीव सातव यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.
पालकमंत्री वर्षा गायकवाड या रात्रीपासूनच सातव यांच्या घरी होत्या. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, उद्योग मंत्री अशोक चव्हाण, मंत्री अस्लम शेख, काँग्रेस नेते नाना पटोले, युवा नेते सत्यजित तांबे, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, माजी आमदार संतोष टारफ़े, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकूळे, माजी आमदार रामराव वडकुते यांच्यासह आजी माजी आमदार, खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

21 तोफांची सलामी, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
राजीव सातव हे विद्यमान राज्यसभेचे खासदार होते. आपले कर्त्वव्य बजावत असताना त्यांचे निधन झाले आहे. त्यामूळे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नांदेड विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक, हिंगोलीचे जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी अशा अधिकारी वर्गाने त्यांना पुष्पचक्र अर्पन केले. तसेच हिंगोली पोलिस दलातर्फे त्यांना 21 तोफांची सलामी देण्यात आली. या अंत्याविधीला बहुतांश अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
राजीव सातव यांचे रविवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पुणे येथील जहाँगीर रुग्णालयात कोरोना रोगामूळे निधन झाले. त्यांचा मृतदेह पुणे येथून दुपारी १२ वाजेच्या सुमारास अ‍ॅम्ब्यूलंसद्वारे हिंगोलीकडे निघाला. रस्त्याने प्रत्येक ठिकाणी त्यांचा मृतदेह असलेल्या अ‍ॅम्ब्यूलंसवर नागरीकानी पुष्पवृष्टी केली. त्यांच्या अ‍ॅम्ब्यूलंसची वाट पाहत कॉन्ग्रेस पक्षासह सर्वच पक्षाचे कार्यकर्ते, नेते मंडळी मोठ्या संख्येने थांबले असल्याचे दिसून आले. रविवारी रात्री त्यांचे पार्थिव घेवून वाहनांचा जत्था हिंगोलीत पोहचताच अग्रसेन चौकात पार्थिव असलेल्या अ‍ॅम्ब्यूलंसवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर वहनांचा ताफा कळमनुरीकडे निघाला. कळमनुरी येथे रात्री ८ वाजता ताफा पोहताच, कळमनुरीकाराना अश्रू अनावर झाले. साहेबांचा ताफा कळमनुरीकराना काही नविन नव्हता. पण आजचा ताफा मात्र, शेवटचा ताफा होता. यानंतर साहेब त्यांच्या पांढर्‍या रंगाच्या कारमधून कधीच कळमनुरीकराना दिसणार नसल्याने अंत्यविधीसाठी आलेला प्रत्येकजनाला गहीवरून आले होते..

वर्षाताई गायकवाड पालकाच्या भुमिकेत...
हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड या राजीव सातव यांचे निधन झाल्यापासून ते अंत्यसंस्कार होईपर्यंत सातव कुटुंबाचा आधार झाल्या होत्या. सातव हे आजारी होते त्यावेळीपासून त्या आपल्या वडीलांचे दु:ख बाजूला सारून सातव यांच्यावरील उपचारावर लक्ष ठेवून होत्या. सातव यांची आई रजनीताई सातव, पत्नी प्रज्ञा सातव, दोन्ही लेकरे याना त्या सतत आधार देत होत्या. सातव यांचे दोन्ही लेकरे वर्षाताई यांच्यासोबतच होते. तसेच प्रज्ञा सातव या सुद्धा वर्षाताई यांच्या खांद्यावरच रडत होत्या. पालकमंत्री गायकवाड यांनी खर्‍या अर्थाने आज सातव कुटुंबाला या दु:खाच्या डोंगरातून बाहेर काढण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी पालकत्वाची भूमिका पार पाडली.

Post a Comment

0 Comments