व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील मेसेजना अ‍ॅडमिन जबाबदार नाही

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल

नागपूर:- केंद्र सरकारने सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या वादग्रस्त आणि भडकावू मेसेजला चाप लावण्यासाठी नुकतीच नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानंतरही व्हायरल मेजेसचे प्रमाण तितकेसे कमी झालेले नाही. अजूनही व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर मोठ्या प्रमाणावर मेसेज व्हायरल होतात. अशा मेसेजेसमुळे व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपची डोकेदुखी वाढते. याच पार्श्वभूमीवर ग्रुप अ‍ॅडमिनला मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. व्हॉट्स अ‍ॅपवर कुणीही काहीही पोस्ट केले वा वादग्रस्त मेसेज टाकले तर त्या मेसेजप्रकरणी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनला जबाबदार धरता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

संबंधित मेसेजमागे ग्रुपचा सामाईक हेतू नसेल तर अ‍ॅडमिनला दोष देता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड. ए. हक आणि न्यायमूर्ती अमित बी. बोरकर यांनी हा निकाल दिला आहे.

प्रकरण 2016 मधील गोंदिया जिल्ह्यातील

हे प्रकरण जुलै 2016 मधील गोंदिया जिल्ह्यातील आहे. तेथील व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या 33 वर्षीय अ‍ॅडमिनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ग्रुपमधील एका सदस्याने ग्रुपच्या महिला सदस्याविरोधात असभ्य, अश्लिल भाषेचा वापर केला होता. त्याप्रकरणी ग्रुप अ‍ॅडमिनलाही जबाबदार धरण्यात आले होते. महिला सदस्याविषयी असभ्य भाषा वापरणाऱ्या सदस्यावर कारवाई न केल्याप्रकरणी ग्रुप अ‍ॅडमिनविरोधात गोंदियाच्या महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते. उच्च न्यायालयाने अ‍ॅडमिनविरोधातील गुन्हा रद्दबातल ठरवून मोठा दिलासा दिला. याचवेळी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपचा अ‍ॅडमिन व आरोपी किशोर चिंतामण तारोणे याने अ‍ॅड. राजेंद्र दागा यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्याच्याविरोधात अर्जुनी मोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याला आव्हान देत किशोरने स्वत:विरोधातील गुन्हा आणि आरोपपत्र रद्द करण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली होती.

काय म्हणाले न्यायालय?

या प्रकरणात व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमधील एका सदस्याने महिला सदस्याविषयी असभ्य भाषेचा वापर केला आहे. मात्र यामागे कुठलाही सामाईक हेतू सिद्ध होत नाही. ग्रुप सदस्याच्या मताचा ग्रुप अ‍ॅडमिनशी कुठलाही संबंध दिसत नाही. अशा प्रकारे सामाईक हेतू नसताना आक्षेपार्ह मेसेजप्रकरणी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनला जबाबदार धरता येणार नाही. व्यक्ती ज्यावेळी एखादा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार करते, त्यावेळी त्या ग्रुपमध्ये जोडल्या जाणाऱ्या सदस्यांच्या गुन्हेगारी कृतींची अ‍ॅडमिनला आधीच कल्पना असू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनला मोठा दिलासा दिला आहे.


The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने