महाराष्ट्रातील 'हे' विद्यार्थी परीक्षा न देताच झाले उत्तीर्ण

शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय....

मुंबई:- महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे शाळेतील शिक्षक पालक विद्यार्थी सगळेच हतबल झाले होते. अनेक शिक्षक संघटना, पालक आणि विद्यार्थी यांनी शालेय शिक्षणमंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्याकडे पहिली ते आठवी यांच्या परीक्षा संदर्भात निर्णय घेण्यासाठी सांगितले होते शालेय विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचे जाहीर केले आहे.

या निर्णयामुळे सर्व विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे. शालेय विद्यार्थी आपणा सर्वांशी इयत्ता पहिली ते आठवी च्या वार्षिक मूल्यमापनाच्या संदर्भात संवाद साधण्यासाठी एक विशेष संदेश शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी प्रसारित केला आहे.

सर्वांना निश्चितच कल्पना आहे की कोविड 19 महामारीच्या अपवादात्मक परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्ष 2020-2021 मध्ये इ. 1 ली ते 4 थी च्या शाळा आपणास सुरु करता आल्या नाही व इ. 5 वी ते ८ वी च्या शाळांमध्ये कमी कालावधीकरिता प्रतक्ष वर्गाध्यापन शक्य झाले. असे असले तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे म्हणून शासनस्तरावरून विविध स्वरूपाचे प्रयत्न केले गेले आहेत व अद्याप देखील ते सुरू आहेत. आपल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने दिक्षा (DIKSHA) आधारित “शाळा बंद…पण शिक्षण आहे” अशा स्वरूपात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना रोज एका विषयाचा घटक देऊन शिक्षण सुरू राहावे म्हणून प्रयत्न सुरू होते. त्याच बरोबर शैक्षणिक दिनदर्शिकेच्या माध्यमातून शिक्षणाशी विद्यार्थ्यांना जोडण्याचे प्रयत्न केले गेले. गली गली सिम सिम, टिलीमिली, ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमांचे डी. डी. सह्याद्री वाहिनीवरून प्रक्षेपण सुरू आहे.

तसेच इयत्ता निहाय यु टयुब चॅनल, जिओ टिव्हीच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले जात आहेत. राज्यातील शिक्षकही या परीस्थितीत ऑनलाईन, ऑफलाईन स्वरूपात विविध उपक्रमाव्दारे शिक्षण सुरू ठेवत आहे.

शालेय शिक्षण विभागाचे वतीने इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन स्वरूपाचे सुरू ठेवणेबाबत कळविण्यात आले होते व याला राज्यातील शिक्षकांनी उत्तम स्वरूपात प्रतिसाद दिला. राज्यात शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शिकणे वेगवेगळ्या मार्गांनी कसे सुरू राहील या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. ज्या ज्या मार्गाने विद्यार्थ्यापर्यत पोहचता येईल त्या त्या मार्गाने विद्यार्थ्याना अध्यापन करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थानी आपापल्या परीने अनेक उपाययोजना केलेल्या आहेत.

अशा परीस्थितीत विद्यार्थ्यांचे मूल्यमापन देखील महत्वाचे आहे. या काळात शिक्षकांनी प्रत्यक्ष वर्गात अध्यापन केलेले नसले तरी इतर साधने व तंत्राचा अध्यापनाकरिता निश्चित उपयोग केलेला दिसून येत आहे. राज्यात शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे इ. १ ली ते इ. ८ वी साठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन सुरू असल्याने शिक्षकांनी आकारिक मूल्यमापन करणे अपेक्षित आहे आणि ते करीत आहेत मात्र संकलित मूल्यमापन करता आले नाही. या स्थितीत शैक्षणिक वर्ष २०२०- २१ मधील कोविड १९ ची अपवादात्मक परिस्थिती पाहता इ. 1 ली ते इ. 8 वी च्या विद्यार्थ्यांना बालकांचा मोफत व सक्तिचा शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार सरसकट वर्गोन्नती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

इ. १ली ते ८ वी च्या सर्व विद्यार्थ्याना वर्गोन्नती देत असताना विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनांबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे अर्थात SCERT, पुणे मार्फत निर्गमित करण्यात येतील. राज्यातील प्रत्येक विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेईल यासाठी आपण निश्चितच कटिबद्ध राहुया.

कोविड-१९ मुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, इ. १ ली ते इ. ८ वी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन न करता सर्वांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्याचप्रमाणे इ. ९ वी आणि इ. ११ वीच्या विषयीसंबंधी निर्णय लवकरच घेण्यात येईल.

0/Post a Comment/Comments

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

Previous Post Next Post