वीज ग्राहकांना दिलासा: घरगुती ग्राहक आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोपर्यंत तोडणार नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मोठी घोषणा

मुंबई: वीज कनेक्शन तोडण्याच्या मुद्द्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. जोपर्यंत चर्चेतून मार्ग निघत नाही तोपर्यंत राज्यातील घरगुती ग्राहक आणि शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी आज विधानसभेत केली आहे. त्यामुळे राज्यातील हजारो वीजग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी भाजप आमदारांनी वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरून सभागृह दणाणून सोडलं. त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. फडणवीस यांनी नियम 57 अन्वये मुद्दा उपस्थित करत या प्रश्नावर तातडीने चर्चा करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी प्रश्नोत्तराचा तास पुढे ढकलावा अशी मागणीही त्यांनी केली.

राज्यातील वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिलं आले आहेत. त्यांच्याकडून वीजबिलांची सक्तीने वसुली केली जात आहे. यात सर्वाधिक शेतकरी भरडला जात आहे. त्याचे वीज कनेक्शन तोडण्यात येत असल्याने शेतीच्या कामांवरही संकट आलं आहे. त्यामुळे तात्काळ या विषयावर चर्चा घडवून आणावी आणि वीज कनेक्शन तोडणं थांबवावं, अशी मागणी फडणवीस यांनी केली. त्यावर काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनीही या विषयावर चर्चा घडवून आणण्याची मागणी केली. तर विधानसभा अध्यक्षांनी हा विषय आधीच सरकारच्या विषय पत्रिकेवर असल्याने त्यावर वेगळी चर्चा करण्याची गरज नाही, असं सांगून या विषयावर वेगळी चर्चा घेण्यास नकार दिला.

यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं. हा विषय ऊर्जा खात्याचा आहे. त्यावर या सभागृहात चर्चा होणार आहे. जोवर विजेच्या विषयवार सभागृहात चर्चा होऊन निर्णय होत नाही. तोवर राज्यातील घरघूती वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली. त्यानंतर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात केली.

विधानसभेत फडणवीस यांनी प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून वीज कनेक्शन तोडण्याचा संदर्भात प्रश्न उपस्थित केला आणि कनेक्शन कापण्याच काम थांबवण्याच मागणी केली होती. कुठेही वीज बिल कनेक्शन कापलं जाणार नाही असं अजित पवार यांनी सभागृहात जाहीर केले. त्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केली. बेस्टच्या जागेवर व्यवसायिक बांधकाम करण्यात आला. पण विकासकांकडून बेस्टला मिळणार पैसे अजून थकले आहेत. बऱ्याच विकासकांनी अजून बेस्टला पैसे दिले नाहीत. या प्रश्नावर चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी करून उचित कारवाई करू असं आश्वासन दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

0/Post a Comment/Comments

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

Previous Post Next Post