हिंगोली जिल्ह्यात 1 ते 7 मार्च या कालावधीत संचारबंदी लागू- जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे आदेश

हिंगोली दि. 27 : राज्यात तसेच जिल्ह्यात कोवडि-19 बाधित रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात 7 दिवस संचारबंदी लागू केली आहे.
या संचारबंदीच्या कालावधीत संपूर्ण हिंगोली जिल्ह्याच्या (ग्रामीण/शहरी) हद्दीतील सर्व प्रकारच्या हालचालीस (व्यक्ती/वाहन) व सर्व आस्थापना, दुकाने, खानावळ इत्यादीकरिता दि. 1 मार्च, 2021 रोजी सकाळी 7.00 ते दि. 7 मार्च, 2021 रोजी रात्री 12.00 या कालावधीत संचारबंदी लागू केली असून खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत.

1. या कालावधीत दूध विक्री केंद्र, दूध विक्रेते यांना सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 पर्यंत चालू ठेवण्यास मुभा राहील.

2. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका या कामकाजासाठी चालू राहतील. या कालावधीत बँका केवळ शासकीय कामकाजासाठी चालू राहतील. यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना ये-जा करण्यासाठी मुभा राहील. परंतु सोबत ओळखपत्र ठेवणे बंधनकारक राहील.

3. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व धार्मिक, प्रार्थना स्थळे, सर्व शाळा, महाविद्यालये, सर्व मंगल कार्यालये, लॉन्स हे बंद राहतील.

4. या कालावधीत औषधी दुकाने चालू ठेवण्यास मुभा राहील.

5. या कालावधीत पत्रकार व त्यांचे कार्यालयीन कर्मचारी यांना या कालावधी वार्तांकन व कार्यालयीन कामकाजासाठी ये-जा करण्यास मुभा राहील. परंतु सोबत ओळखपत्र ठेवणे बंधनकारक राहील.

6. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गाची कामे व दुरुस्ती करण्यास, आरोग्य, शासकीय विभागाशी संबंधित बांधकामे, महावितरण, महापारेषण आणि इतर विद्युत विषयक विभागाकडील देखभाल व दुरुस्तीची कामे, दूरसंचारशी संलग्न सेवा, पाणीपुरवठा, जलनिस्सारण आणि स्वच्छता विषयक कामे, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत परवानगी देण्यात आलेल्या वाळू घाटातून रेती उत्खनन व वाहतूक संबंधित कामे करण्यास मुभा राहील. यासाठी संबंधित विभागाकडील आदेश, ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक राहील.

7. या कालावधीत जिल्ह्यातील पेट्रोल पंप केवळ शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवा देणारी वाहने व कृषी सेवा संबंधित वाहने यांना इंधन पुरवठा करण्यासाठी चालू राहतील.

8. या कालावधीत बाहेरील विद्यार्थी , बाहेर जिल्ह्यातील अडकलेले नागरिक यांच्यासाठी परवानाधारक खानावळ, हॉटेल केवळ पार्सल सुविधेसाठी सकाळी 9.00 ते रात्री 7.00 पर्यंत उघडण्यास मुभा असेल.

वरीलप्रमाणे संचाराची मुभा दिलेल्या व्यक्तींना सामाजिक अंतर राखणे तसेच मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. यानुसार संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवा, परवानगी घेतलेल्या व्यक्तीशिवाय इतर कोणतीही व्यक्ती रस्त्याने, बाजारामध्ये , गल्लीमध्ये , गावामध्ये, घराबाहेर फिरताना आढळून आल्यास त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

वरीलप्रमाणे आदेशाची सक्तीने अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. हिंगोली, पालीस अधीक्षक, हिंगोली, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी, नगर परिषद/नगर पंचायत, ग्रामसेवक, तलाठी व इतर संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

Previous Post Next Post