'टाइम’ने दिले भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर 'रावण' यांना उदयोन्मुख नेत्यांच्या यादीत मानाचे स्थान.....

याच यादीत इतर पाच भारतीय व्यक्तींचा समावेश...

नवी दिल्ली:- जगप्रसिद्ध 'टाइम’ नियतकालिकाने जगभरातील १०० उदयोन्मुख नेत्यांची यादी जाहीर केली असून, त्यात भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टीचे प्रमुख चंद्रशेखर रावण यांच्यासह भारतीय वंशाच्या पाच जणांचा समावेश आहे. यामध्ये ‘ट्विटर’च्या मुख्य जनसंपर्क अधिकारी विजया गड्डे, ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक, ‘इन्स्टाकार्ट’चे संस्थापक आणि सीईओ अपूर्व मेहता, ‘गेट अस पीपीआय’ या सेवाभावी संस्थेच्या कार्यकारी संचालक शिखा गुप्ता, ‘अपसॉल्व्ह’ संस्थेच्या रोहन पवुलुरी यांचा समावेश आहे.

भविष्यावर परिणामकारक ठरू शकणाऱ्या शंभर व्यक्तिंच्या कार्याचा आढावा 'टाइम'कडून घेण्यात आला.

चंद्रशेखर आझाद 'रावण'
भारतात बहुजन आणि दलित समाजाला अज्ञानाच्या आणि गरिबीच्या खाईतून काढण्यासाठी चंद्रशेखर आझाद काम करीत आहेत. कट्टर आंबेडकरवादी असलेले रावण स्वत: एक शाळा चालवतात. जातिभेदामुळे अन्याय झालल्यांचे रक्षण करण्यासाठी आझाद धावून जातात. हाथरस सामूहिक बलात्कारप्रकरणातील पीडितेला न्याय मिळावा यासाठी आझाद यांनी आंदोलन केले असल्याचे 'टाइम'ने म्हटले. उत्तर प्रदेशमध्ये मागील काही वर्षांमध्ये अनुसुचित जाती समुदायातील नवीन नेतृत्व म्हणून रावण यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

रोहन पवुलुरी
पंचविशीतला रोहन पवुलुरी दिवाळखोरीचा फॉर्म भरण्यासाठी एका ऑनलाइन वेबसाइटद्वारे मोफत मदत देतो. अमेरिकेत करोना महासाथीच्या आजाराने थैमान घातले. लाखोजणांचे रोजगार गेले. अनेक लहान उद्योगही बंद पडले. अशावेळी दिवाळखोर झालो असल्याचे जाहीर करण्यासाठीची प्रक्रिया अतिशय खर्चिक आणि जटील आहे. मात्र, रोहन यांनी ही सेवा मोफत देऊ केली.

अपूर्व मेहता
‘इन्स्टाकार्ट’ला करोनाकाळात उदंड प्रतिसाद मिळाला. अनेक उद्योगपतींनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी इन्स्टाकार्टद्वारे मोठ्या प्रमाणात धान्य खरेदी केले. मेहता यांच्या मते ‘आगामी काळात स्मार्ट फोन हेच आपल्यासाठी सुपर मार्केट असणार आहे आणि ही गोष्ट प्रत्यक्षात यावी यासाठी इन्स्टाकार्ट काम करीत आहे.’

विजया गड्डे
विजया गड्डे यांचे वर्णन ‘टाइम’ने ‘सर्वोच्च अधिकार असणाऱ्यांपैकी एक अधिकारी’ अशा शब्दांत केले आहे. गड्डे यांनी अमेरिकेतील निवडणुकीनंतर व्हाइट हाउस येथे झालेल्या हिंसाचारानंतर कोणत्याही दबावाला बळी न पडता अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर काही काळासाठी निलंबित केले होते. गड्डे यांनी २०१९मध्ये सर्व राजकीय जाहिरातींना ट्विटरवर बंदी घातली.

शिखा गुप्ता
अमेरिकेतील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना करोनापासून बचाव करणाऱ्या उपकरणांची कमतरता भासत होती अशा वेळी शिखा गुप्ता यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी सुरक्षा उपकरणे पुरविण्यासाठी मोठी मोहीम आखली.

ऋषी सुनक
ब्रिटनचे अर्थमंत्री असून, ‘इन्फोसिस’चे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. निवडून आल्यानंतर सुनक यांच्याकडे फारसे महत्त्वाचे पद देण्यात आले नव्हते. मात्र, गतवर्षी ४० वर्षीय सुनक यांच्याकडे अर्थमंत्रिपदाचा भार सोपवण्यात आला. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याची मोठी जबाबदारी सुनक यांच्या खांद्यावर आहे. करोना महासाथीच्या काळात सरकारच्या उदारमतवादी धोरणांचा ते चेहरा झाला असून लोकांना दिलासा देण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने