'मूकनायक' पुरस्कार द्या, हिंगोलीतील पत्रकार भवन मुक्त करा...

आंबेडकर प्रेस कौन्सिलची पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

हिंगोली:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पत्रकारितेमधील योगदान लक्षात घेता आणि त्यांच्या पत्रकारितेमधून आजच्या आणि भावी पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी 'मूकनायक: डॉ. आंबेडकर सामाजिक पत्रकारिता पुरस्कार' राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात यावा या मागणीसह हिंगोली येथील पत्रकार भवन सर्व पत्रकारांसाठी खुले करण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी आज आंबेडकर प्रेस कौन्सिलच्या वतीने हिंगोलीच्या जिल्हा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.

हिंगोली येथे जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज आल्या आहेत. त्यांना देण्यात आलेल्या निवेदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पत्रकारितेतील योगदान लक्षात घेता आणि डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक पत्रकारितेमधून सध्याच्या आणि भावी पिढीला सुद्धा प्रेरणा मिळावी, सामाजिक पत्रकारिता विकासाभिमुख पत्रकारिता करणाऱ्यांना बळ मिळावे यासाठी मूकनायक: डॉ. आंबेडकर सामाजिक पत्रकारिता पुरस्कार राज्य शासनाच्या वतीने देण्यात यावा, २० वर्षापेक्षा अधिक वर्षे श्रमजीवी पत्रकार म्हणून सेवा बजावलेल्या पत्रकारांना प्रतिमहिना २० हजार रुपये एवढे मानधन देण्यात यावे, साप्ताहिक वर्तमानपत्रांना वर्षातून २४ सरकारी जाहिराती देण्यात याव्यात, मजीठिया वीज बोर्डनुसार सर्व पत्रकारांना वेतन देण्यात यावे आणि बोर्डाच्या शिफारशी लागू न करणाऱ्या वर्तमानपत्रांना महाराष्ट्रात वृत्तपत्र प्रसिद्ध करण्यापासून प्रतिबंधित करण्यात यावे, आणि हिंगोली येथील पत्रकार भवन अतिक्रमणातून मुक्त करून पत्रकार संघाच्या ताब्यात देण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी आंबेडकर प्रेस कौन्सिलचे संस्थापक अध्यक्ष ॲड. रावण धाबे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. यू. एच. बलखंडे, जिल्हाध्यक्ष डॉ. प्रल्हाद शिंदे, प्रदेश सचिव संदीप नागरे, मीडिया प्रमुख सुधाकर वाढवे, तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील, जिल्हा सरचिटणीस दयाशिल इंगोले, जिल्हा उपाध्यक्ष बिभिषण जोशी, जिल्हा सचिव रवी शिखरे, संतोष भिसे, मनीष खरात, एस. एम. कांबळे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या