Woman Salvation Day: मनुस्मृती दहन दिवस आणि आजची प्रासंगिकता: दोन मतप्रवाह.......

समर्थक विचार:- 

25 डिसेंबर 1927 रोजी प्रतीकात्मक पद्धतीने केलेल्या मनुस्मृती दहनाची आठवण आजही प्रकर्षाने जागी होते. महाडच्या चवदार तळ्याचा खुला वापर आणि काळाराम मंदिर प्रवेशाचा संदर्भ यामागे होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली केलेल्या त्या कृतीतून एकाच वेळी जातिभेद आणि स्त्रीदास्य या दोहोंच्या अंतासाठी संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त झाला होता. मनुस्मृती दहनाची कृती हिंदू धर्मातील भेदभाव आणि शोषणाला समर्थन देणार्‍या विचारसरणीच्या विरोधात होती. त्यातूनच समता, न्याय आणि परस्पर आदर यावर आधारित समाज तयार होईल याची बाबासाहेबांना खात्री होती. त्या वेळी भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘ज्ञान ही पुरुषांची किंवा कोण्या एका जातीची मक्तेदारी नाही. सर्व जातीतील स्त्री-पुरुषांना ते उपलब्ध असायला हवे...’ स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरही समतेच्या आंदोलनाला यातून पाठबळ मिळाले आहे. (Why Manusmruti was torched by Dr. Babasaheb Ambedkar? Is it right today to burn the Hindu religious book?)

२५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चातुर्वर्ण्य व्यवस्था बळकट करणारा, महिलांना जनावरासमान दर्जा देणारा मनुस्मृती हा हिंदूंचा पवित्र धर्मग्रंथ जाळून टाकला. आता या घटनेला ९३ वर्षे होत आहेत. त्यांचा धर्मच आपण सोडला आहे, तेव्हा पुन्हा पुन्हा त्या धर्माच्या ग्रंथाला का जाळत बसायचे? तुम्हाला सर्व महिलांना समानता द्यायची असेल, तसा विचार द्यायचा असेल तर हाच न्याय इतर धर्मातील विषमतावादी ग्रंथांना का लावला जात नाही? हा ग्रंथ दहन करण्यापेक्षा, या दिवशी धम्मग्रंथ वाचन करून, सर्वच स्तरावरील विषमता नष्ट करण्यासाठी कृतिशील कार्यक्रम का राबविला जात नाही? असे विरोधी विचार आज उपस्थित होतात. तसेच जो पर्यंत समाजात विषमता आहे, तोवर धर्माधिष्ठित विषमता प्रसारित करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन झालेच पाहिजे, जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांना भारतात विषमता कुणी निर्माण केली याचा इतिहास समजला पाहिजे असले विचारही आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज मनुस्मृती दहन दिनानिमित्त दोन विचारांचा घेतलेला आढावा......

1970च्या दशकापासून सक्रिय असलेली स्त्री चळवळ अनेक बाजूने वाढली. स्त्रियांवर कुटुंबात आणि कुटुंबांबाहेर होणार्‍या हिंसेच्या प्रश्नावर काम केले. दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, कष्टकरी आणि आदिवासी स्त्रीचे आजच्या समाजव्यवस्थेत तिहेरी शोषण होते, ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली. त्यामुळे 1990च्या दशकात या स्त्रियांच्या प्रश्नांभोवती वेगवेगळ्या संघटना तयार झाल्या. त्याचाच एक भाग म्हणून 1996 मध्ये ‘विकास वंचित दलित राष्ट्रीय महिला परिषद’च्या डॉ. प्रमिला लीला संपत यांनी चंद्रपूर येथे हजारो महिलांच्या साक्षीने मनुस्मृती दहन दिवस ‘भारतीय महिला दिन’ म्हणून जाहीर केला. त्यामागचा विचार असा होता : प्राचीन काळी मनुस्मृतीने स्त्री आणि शूद्र यांना दुय्यम मानले. स्वातंत्र्यानंतर घटनेत वर्ग, वर्ण, लिंग आणि जातिभेदाला नकार देत समतेचे तत्त्व आपण स्वीकारले; पण आजही अनेक बाबतींत घटनेच्या विरोधात जाऊन मनुस्मृतीच्या पाठबळाने असा भेदभाव केला जातो. त्याचे भान जागृत ठेवण्यासाठी मनुस्मृती दहन दिवस आणि भारतीय महिला दिवस यांची सांगड घालायला हवी. त्यामुळे अशा भेदभावाला विरोध करण्याची आपली ताकद वाढेल. हा विचार गेल्या दशकात आपलासा होत आहे. त्याप्रमाणे अनेक शहरांतून या भारतीय महिला दिवशी स्त्री-पुरुष आणि जातिभेदांवर आधारित शोषणाच्या प्रश्नांकडे समाजाचे लक्ष वळवण्यात येते.
भेदभावाचे समर्थन करणार्‍या विचारसरणीचा पगडा समाजमनावर आजही आहे. याची अनेक उदाहरणे आहेत. जयपूर न्यायालयासमोर मनूचा पुतळा स्थापन केला आहे. तो हटवण्यासाठी गेली कित्येक वर्षे आंदोलने होत आहेत; पण ते दुर्लक्षित राहते. राजस्थान सरकारच्या महिला विकास प्रकल्पात साथी म्हणून काम करणार्‍या भटेरी गावातील भंवरीदेवीने तिच्या कामाचा भाग म्हणून बालविवाह रोखला; पण ते घर होते उच्चजातीय मुखियाचे. जात आणि वर्ग हितसंबंध डिवचल्याने धडा शिकवण्यासाठी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दाद मागण्यासाठी कोर्टात गेलेल्या भंवरीदेवीला खोटी ठरवत न्यायाधीश निकालात म्हणतात, ‘खालच्या कुम्हार जातीच्या भंवरीवर उच्च जातीतील ज्येष्ठ ब्राह्मण बलात्कार कसे करतील?’ या संतापजनक निकालाचा स्त्री आंदोलनाने निषेध केला. तर उच्च जातीच्या समर्थनार्थ समविचारी राजकीय पक्षाच्या पुढाकाराने बलात्कारींचा जाहीर सत्कार केला. ही घटना सन 1997 ची आहे. आजही बलात्काराची शिकार होणार्‍यांमध्ये दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, कष्टकरी आणि आदिवासी स्त्रियांची संख्या जास्त आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यांतील नफ्याला बांधलेल्या अर्थव्यवस्थेत या स्त्रिया ‘अतिगरीब’ आणि ‘असंघटित’ स्तरांत वेगाने ढकलल्या जात आहेत. आपले रोजी-रोटीचे, जगण्याचे घटनादत्त हक्क मागण्यासाठी न्याय्य लढा देणार्‍या स्त्रियांवर ‘नक्षलवादी’ म्हणून शिक्का मारून खोट्या केसेसखाली त्यांना तुरुंगात डांबले जाते. तेथे त्यांचा अनन्वित छळ केला जातो. माध्यमांत थोडासा बोलबाला झालेले सोनी सोरी या छत्तीसगढमधील गोंड आदिवासी शिक्षिकेचे अलीकडील उदाहरण आहे. दिल्लीमधे 16 डिसेंबर रोजी झालेल्या निदर्शनात बेलवर सुटलेल्या सोनी सोरीने भाग घेतलेला. त्या वेळी ती म्हणाली, ‘माझे शिक्षण झाल्याने मी अन्यायाची दाद मागण्याचे धैर्य दाखवले. माझी लढाई चालूच आहे; पण माझ्यासारख्या कितीतरी स्त्रिया तुरुंगात डांबलेल्या आहेत. त्यांना आपण कोणता गुन्हा केला हे माहीतही नाही. त्यांना कोण न्याय मिळवून देणार?’ सोनी सोरीने विचारलेल्या प्रश्नाने आपण अंतर्मुख व्हायला पाहिजे. घटनेतील हक्क प्रत्यक्ष मिळवायचे असतील, तर अनेक पातळीवर संघर्ष करायला हवा, या वास्तवाकडे ती आपले लक्ष वळवते. आज सर्व जाती-वर्गातील स्त्रियांच्या (आणि पुरुषांच्याही) जगण्याला स्वतंत्र भारताच्या घटनेचा आधार असण्याऐवजी त्यांच्या त्यांच्या धर्म आणि जातींच्या अस्मितांचा आधार बळकट होत आहे. समताधिष्ठित समाजासाठी ही धोक्याची बाब आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे सप्टेंबर महिन्यात ‘बहू-बेटी बचाव महापंचायत’ भरवून, वास्तवाचा आधार नसलेले भडक व्हिडिओ दाखवून समाजात मुस्लिम द्वेष पेटवून दिला. त्यानंतर दंगली घडवण्यात आल्या. त्यामध्ये मुस्लिम समाजातील स्त्रियांवर अमानुष हिंसा करण्यात आली. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त केली. मुले-बाळे पोरकी झाली. आज मदत छावणीतील कडाक्याच्या थंडीत गारठणारी तीन लेकरांची आई म्हणते, ‘माझ्याजवळ एकच कोट आहे. त्यामुळे दर तीन दिवसांतून तो मी एकाला घालते. तेवढीच एक रात्र पाळी-पाळीने ऊब मिळते.’ थंडीने कित्येक लहानगी मरण पावल्याने नुकतेच न्यायालयाने राज्य शासनाला प्रश्न विचारले आहेत. या गोष्टीने आपले समाजमन का हेलावत नाही, हा प्रश्न जणू ती लहानगी विचारत आहेत. एवढेच नव्हे, तर मोदींच्या प्रचाराच्या सभेत ज्या सदस्यांवर दंगलीतील सहभागाचे गुन्हे दाखल आहेत अशांचा सत्कार करण्यात आला. आपले सामाजिक न्याय या संदर्भातील व्यवहार संसदेपेक्षा ‘धर्मसंसदे’नुसार व्हावेत याला दुजोरा देणारी गोष्ट नुकतीच अहमदाबाद येथे घडली. ‘आसाराम आणि त्यांच्या मुलावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपामागे षड्यंत्र होते आणि याचा निवाडा ‘धर्मसंसद’ करेल,’ असे सांगण्यात आले. ही गोष्ट देशातील पोलिस - न्याय यासारख्या घटनादत्त प्रक्रियेला आव्हान देणारी आहे. शिवाय स्त्रियांवर केलेल्या अत्याचारांचे निराकरण करण्याऐवजी तो झालाच नाही, अशी आवई उठवणे गैर आहे. (Dr. Babasaheb Ambedkar along with his Brahmin colleagues on 25 December 1927 has burned a copy of Manusmruti - the Hindu religious book which had given birth to four fold caste system in India)

आज वरील संदर्भांची उजळणी करणे अत्यंत निकडीचे आहे. समताधिष्ठीत समाजाची आस असणार्‍या सर्वांसाठी यातून मार्ग काढण्याचे आव्हान आहे. आजचे वास्तव दाहक असले, तरी ते बदलणे आवश्यक आहे. सामान्य स्त्री-पुरुष प्रचंड धैर्य दाखवत वास्तवाला सामोरे जात आहेत. मुद्दा आहे आपण त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा. संकुचित अस्मिता न उगाळता दलित, मागासवर्गीय, कष्टकरी, आदिवासी आणि अल्पसंख्याकांच्या जगण्याचा अर्थ लावण्याचा. सम्यक सामाजिक परिवर्तनासाठी काही गोष्टी सजगतेने करण्याचा. समतेसाठी पितृसत्ताकता-जात-धर्म-अर्थ आणि राजसत्ता या सर्वांबरोबर संघर्ष करण्याचा. हा संघर्ष सर्वंकष होण्यासाठी मनुस्मृती दहन आणि भारतीय महिला दिवस या दोन्हींचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. (Woman Salvation Day in India: 25th December is celebrated as woman Salvation Day. On this day, Dr. Ambedkar had burnt Manusmruti book)

विरोधी विचार:- 

डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली त्याला पुढच्या वर्षी ९३ वष्रे पूर्ण होतील. त्यानंतरची आज तिसरी किंवा चौथी पिढी हयात आहे आणि तिचाही मनुस्मृती जाळण्यावर भर आहे! अशा किती पिढय़ा आपण मनुस्मृती जाळणार आहोत? जे जाळून टाकायच्या लायकीचे आहे ते दरवर्षी आठवणीने जाळत बसण्यात काय अर्थ आहे? मनुस्मृतीबद्दलचे हे छुपे आकर्षण तर नाही ना? डाव्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना अजूनही मनुस्मृतीच का आठवते? ती एकदा जाळून टाकलीय ना? बाबासाहेबांनी मनुस्मृती जरूर जाळली, पण तो त्यांच्या चळवळीचा प्रारंभिबदू होता, दरवर्षी करायचा उत्सव नव्हे आणि अंतिम टप्पा तर नव्हेच नव्हे! मनुस्मृती नष्ट केल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि नव्या पिढीच्या हातात समर्थ पर्याय दिला. एखादी गोष्ट मुळापासून संपुष्टात आणायची असेल, कायमची विस्मरणात टाकायची असेल तर तिच्या जागेवर नवे बॅनर, नवी तत्त्वमूल्ये, नव्या निष्ठा आणि धारणा निर्माण कराव्या लागतात, हा ‘पोकळी-पर्याय’ सिद्धान्त आहे. डावी मंडळी असा पर्याय कधी देणार आहेत? का आणखी पाच-पंचवीस वर्षांनीही त्यांचा कार्यक्रम मनुस्मृती जाळण्याचाच असणार? चांगले पीक घ्यायचे असेल तर प्रथम त्या शेतातील तण काढावे लागते. उत्तम पीक घेण्याचा हा पहिला भाग असतो. त्या शेतात उत्कृष्ट प्रतीचे बीजारोपण करून त्याची मशागत करणे हा दुसरा भाग असतो. मनुस्मृती जाळणे हा बाबासाहेबांच्या क्रांतीचा नकारात्मक पूर्वार्ध होता. त्या क्रांतीचा सकारात्मक उत्तरार्ध १९५६ साली नागपूरच्या दीक्षाभूमीवर अवतरला. पुरोगामी लोक मात्र केवळ पूर्वार्धावरच संपूर्ण लक्ष केंद्रित करत आहेत! उत्तरार्धाचे काय? तण काढल्यानंतर ती शेतजमीन (नवे बीज न पेरता) तशीच मोकळी ठेवली तर तीत पुन्हा तणच उगवून येते. वारंवार मनुस्मृती जाळणे म्हणजे वारंवार तण उपटून काढणे!

या संदर्भातला आंबेडकरांचा मार्ग हा गोळीबंद पॅकेजसारखा आहे. त्याचा फक्त पहिला अर्धा भागच अनुसरला तर ‘काय नको आहे’ एवढेच समजेल. ‘काय हवे आहे’ हे समजावून घ्यायचे असेल तर दुसरा अर्धा भाग लक्षात घेणे आणि तो निष्ठेने आणि डोळसपणे अनुसरणे आवश्यक ठरते. लोकरहाटी केवळ नकारावर चालत नाही, स्वीकारावर चालते. स्वीकाराचा अपरिहार्य टप्पा म्हणून प्रारंभी काही नकार द्यावे लागतात. मनुस्मृतीला नकार हा त्यातला एक भाग आहे. (Why people burn copy of Manusmruti and why Hindu people oppose burning of Manusmruti in India?)

इथे एक मूलगामी प्रश्न उपस्थित करावासा वाटतो तो म्हणजे, मुसलमान किंवा ख्रिश्चन लोक मनुस्मृती जाळतात का? (वरकरणी हा प्रश्न भलताच बालिश वाटेल, पण तो तसा मुळीच नाही.) या प्रश्नाचे उत्तर सोपे असले तरी तेच फार महत्त्वाचे आहे. मुसलमान हे मुसलमान आहेत किंवा ख्रिश्चन हे ख्रिश्चन आहेत म्हणून ते मनुस्मृती हा काय प्रकार आहे आणि त्यात काय लिहिलेय, याचा विचार करत नाहीत! त्यामुळे ते मनुस्मृती जाळण्याच्या भानगडीत पडत नाहीत. ते िहदू नसतात, त्यामुळे त्यांनी िहदूंच्या धर्मग्रंथांबद्दल काही भूमिका घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मनुस्मृतीबद्दल कसलीच भावना त्यांच्या मनात नसते. तिच्याशी संबंधच नसतो! मनुस्मृती हा विषयच त्यांच्या निष्ठेच्या कक्षेबाहेरचा असतो. नेमके हेच मर्म लक्षात घेऊन पुरोगामी मंडळींनी जाळण्याच्या पातळीवर नव्हे, तर निष्ठेच्या पातळीवर मनुस्मृतीशी असलेला संबंध संपुष्टात आणला पाहिजे. तसे केले की मग मनुस्मृतीची आठवण होण्याचे काहीच कारण असणार नाही आणि ऊठसूट तिचे दहन करून तिला अकारण प्रसिद्धी देण्याची आवश्यकता उरणार नाही. (Why Muslims and Christians do not burn Hindu religious book, Manusmruti?)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या