ग्रामपंचायत निवडणुक: 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठी कार्यक्रम जाहीर

योगिता काचगुंडे
मुंबई, दि. 11:- 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात एप्रिल ते डिसेंबरमध्ये या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून, 15 जानेवारीला मतदान होणार आहे, तर 18 जानेवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित सुमारे एकूण 14,234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम संगणकीकृत पद्धतीनं राबविणार असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. कोरोनाच्या साथीच्या आजाराच्या संसर्गाची गंभीर परिस्थिती उद्भवल्यानं मार्च 2020मध्ये सुमारे 1566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका निवडणूक आयोग्याच्या आदेशानुसार 17 मार्च 2020ला स्थगित करण्यात आल्या होत्या.

आता निवडणूक आयोगानं 20 नोव्हेंबर 2020च्या आदेशान्वये एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमानुसार संबंधित जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार 1 डिसेंबर 2020 रोजी सुमारे 14234 ग्रामपंचायतींसाठी प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून, 7 डिसेंबर 2020पर्यंत त्यावर हरकती घेण्यात आल्या आहेत. 9 डिसेंबरच्या सुधारित कार्यक्रमानुसार अंतिम मतदारयादी 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

सदर निवडणुका पार पाडताना कोरोनाच्या अनुषंगाने घ्यावयाच्या खबरदारीबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून स्वतंत्रपणे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. त्याचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनही निवडणूक आयोगानं केलं आहे. महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे. महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण आहे.

नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबरपर्यंत द्यावी लागणार

या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी 31 डिसेंबर 2020 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल, असे त्यांनी सांगितले.

25 सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य धरणार

विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत, अशी माहितीही निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.

एप्रिल, मे आणि जूनमध्ये महाराष्ट्रातील 1566 ग्रामपंचायतींची मुदत संपली होती. या काळात या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणे आवश्यक होते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणे, निवडणुकीचे कामकाज, प्रचारसभा, मेळावे आदींचे आयोजन केले जाते. लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येतात. यातून कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन या ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

1 हजार 566 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय

विशेष म्हणजे राज्यात एप्रिल, मे आणि जूनमध्ये मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. ग्रामपंचायत कायद्यामध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी अध्यादेश काढण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. राज्यपालांच्या मान्यतेनंतर अध्यादेश निघणार होता. तर जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान प्रस्तावित असलेल्या 12 हजार 668 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने