Election: जात पडताळणीसाठीचे अर्ज ऑफलाईनही स्वीकारणार; धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा

मुंबई।डीएम न्यूज:- राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांना आज आणि उद्या 30 डिसेंबर रोजी जात पडताळणीसाठीचे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन भरता येणार आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या राखीव मतदारसंघातील उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. (caste verification form can submit offline says dhananjay munde)
राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जात पडताळणीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऑनलाईन प्रक्रियेचा वेग मंदावला आहे. म्हणूनच आज २९ डिसेंबर आणि उद्या ३० डिसेंबर या दोन दिवशी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतींनी जात पडताळणीचे अर्ज स्वीकारावेत असे निर्देश सर्व जात पडताळणी समित्यांना दिले असल्याचं धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून स्पष्ट केलं आहे. अर्ज स्विकारण्याच्या खिडक्या वाढवाव्यात तसेच दोन्ही दिवशी कर्मचाऱ्यांनी पूर्णक्षमतेने व पूर्ण वेळ काम करून आलेले सर्व अर्ज दाखल करून घ्यावेत, असे आदेश देतानाच सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

उमेदवारांना जात प्रमाणपत्र पडताळणीच्या अर्जाची पोचपावती मिळावी, गैरसोय होऊ नये याकरिता 29 व 30 डिसेंबर असे दोन दिवस अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. ठिकठिकाणी समितीने अर्जाची संख्या लक्षात घेत अर्ज स्वीकारण्याची खिडकी/कक्ष वाढवावेत व कर्मचाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने व पूर्ण वेळ काम करावे. या दोन्ही दिवशी आलेले सर्व अर्ज दाखल करेपर्यंत कार्यालय सुरू ठेवावीत तसेच ऑफलाईन दाखल केलेल्या अर्जाची माहिती 1 जानेवारी 2021 पर्यंत बार्टीकडे लेखी स्वरूपात कळवावी, असे आदेश राज्यातील सर्व जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना देण्यात आले आहेत.

ऑनलाईन अर्ज भरताना अडचणी

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जात पडताळणीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढल्याने ऑनलाईन प्रक्रियेत अडचणी येत होत्या. सर्व्हरवरती लोड आल्याने अनेक ठिकाणी अर्जच भरले जात नव्हते. त्यामुळे काम अत्यंत मंदगतीने सुरू होते. त्याबाबतच्या तक्रारी वाढल्याने अखेर मुंडे यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत दोन दिवस ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राखीव मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

15 जानेवारीला मतदान

राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान; तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रात ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362 अशा एकूण- 14,234. (caste verification form can submit offline says dhananjay munde) ग्राम पंचायतीमध्ये निवडणूक होणार आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने