प्रेमविवाह: हिंगोली येथे सासर्‍याने केला जावयाचा खून

मित्राला केलेल्या फोनमूळे घटनेला फुटली वाचा..... 

हिंगोली/बिभिषण जोशी, दि.३:- सुमारे दिड वर्षांपुर्वी मुलीशी केलेल्या प्रेम विवाहाचा राग मनात ठेवून हिंगोली शहरातील कमलानगर येथील २१ वर्षीय तरुणाचा सासर्याने त्याच्या ३ ते ४ साथीदारांसह  निर्घृण खून केल्याची घटना घडली असून याबाबत नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत नर्सी नामदेव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैभव जयचंद वाठोरे (२१) रा. शिंदेफळ ता. जि. हिंगोली, ह. मू. कमलानगर, हिंगोली असे मयताचे नाव आहे. मयताचे वडील जयचंद वाठोरे यानी दिलेल्या फिर्यादीनुसार, मयत वैभव याचे जिजामातानगर येथील मधूकर नामदेव लोणकर यांच्या निकिता नावाच्या मुलीशी १७ जून २०१९ रोजी प्रेमविवाह झाला होता. तर त्यापुर्वी याच प्रेम प्रकरणातून मयतावर अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याचा गुन्हाही दाखल झाला होता.
केलेल्या मित्राला केलेल्या फोनमुळे फुटली खुनाला वाचा

वैभव वाठोरे याने त्याचा मित्र महेंद्र पडघन याला दिनांक ३० नोव्हेंबर २०२० रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास फोन केला होता. या फोनमध्ये बोलताना त्याने महेंद्र पडघन यांना सांगितले की, माझ्या सासऱ्याने मला रेतीचे ट्रॅक्टर पकडण्यासाठी बोलावले आहे. तिकडे काही माझे बरेवाईट झाल्यास तू लक्ष ठेव. या ऑडिओ क्लिपनंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी हा त्याचा सासरा असल्याचे निश्चित झाले. वैभव याने त्याच्या सासऱ्यावर संशय व्यक्त केल्यामुळे या खुनाला वाचा फुटली आहे.
लग्नानंतर सासरा आणि जावयामध्ये न पटल्याने दोघामध्ये खटके उडण्यास सुरूवात झाली. याच प्रेम प्रकरणातून मयत वैभव याला जिवे मारण्याच्या धमक्या सासऱ्याकडून मिळत होत्या. ३० ऑक्टोबर २०२० रोजी रात्री वैभव सासऱ्यासोबत जातो म्हणून बाहेर गेला तो परत आलाच नाही. त्याची चौकशी केली असता तो कुठेही मिळून आला नाही. तर ०२ नोव्हेंबर २०२० रोजी नर्सी नामदेव पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चांगेफळ येथील हरिश्चंद्र रामप्रसाद शिंदे यांच्या शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला.
मयताच्या खिशात सापडली चिठ्ठी...

मयत वैभव जयचंद वाठोरे यांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी आढळून आली आहे. या चिठ्ठीत आपण कामधंदा नसल्याने आर्थिक संकटाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे म्हटले आहे. आपल्या आत्महत्येस कुणीही जबाबदार नसल्याचेही त्या चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे. परंतु वैभव याने लिहिलेली चिठ्ठी ही पोलिथिन बॅगमध्ये आणि स्टेपलर मारलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे मयताने एवढ्या पूर्व नियोजित पद्धतीने आत्महत्या करण्यावरच असा संशय निर्माण होत आहे. त्याला आत्महत्याच करायची असेल तर त्याने हिंगोली शहराजवळच एखाद्या ठिकाणी आत्महत्या का केली नाही? हिंगोली शहरापासून २०-२५ किलोमीटर अंतरावर जावून त्याने आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यासाठी रात्रीच्या वेळी त्याला घटनास्थळी कुणी नेवून सोडले? त्याला आत्महत्याच करायची होती तर त्याने मोबाईल फोनवर मित्राला बोलून त्याच्या सासऱ्यावर संशय व्यक्त का केला? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे मयताला जीवे मरण्यापूर्वी अत्यंत थंड डोक्याने त्याचा काटा काढण्याच्या हेतूने काम तमाम केले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मयताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी सोशल मिडीयावर मयताचे वर्णन देवून आवाहन केले असता, मयताचे मित्र राहुल खिल्लारे आणि अक्षय इंगोले यानी ही माहिती मयताच्या वडीलांना कळविली. त्यानंतर रात्रीच मयताची ओळख पटली. मयताचे वडील जयचंद वाठोरे यानी दिलेल्या फिर्यादीनुसार, मयताचा आरोपी सासरा मधूकर नामदेव लोणकर (तलाठी) याने त्याची मुलगी निकिता हिच्याशी मयताने केलेल्या प्रेमविवाहाच्या कारणावरून ३ ते ४ साथिदारांसह वैभव वाठोरे याचे हातपाय बांधून विहिरीत फेकून खून केला असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. त्यावरून नर्सी नामदेव पोलिसानी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पत्नीवर होते खूप प्रेम....

वैभवने पत्नीशी प्रेम विवाह केल्यामुळे त्याचे पत्नीवर खूप प्रेम होते. सासऱ्यामुळे पत्नी बोलत नसली तरी वैभव पत्नीच्या प्रेमापोटी तो सासऱ्याची वाद घालून नेहमीच तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असे. सासऱ्याच्या घरासमोर चकरा मारण्याच्या कारणावरून अनेक वेळा वादही झाले होते, अशी माहिती आहे. पत्नीवर असलेल्या प्रेमापोटी त्याने हातावर ब्लेडने "आय लव्ह यू निकिता" हे नाव कोरलेला फोटो सुद्धा टाकला होता. परंतू याच प्रेम प्रकरणात त्याचा शेवट झाला.

0/Post a Comment/Comments

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

Previous Post Next Post