आदिवासी विद्यार्थ्यांना यूपीएससी तयारीसाठी मिळणार १२ हजार रूपये विद्यावेतन

मुंबई, दि. २०:- आदिवासी विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षेची आणि मुलाखतीची तयारी या वर्षापासून आर्थिक सहाय्य करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दरमहा १२ हजार रुपये विद्यावेतन आणि १४ हजार रुपये पुस्तक खरेदीसाठी असे एकूण २६ हजार रुपये देण्यात येणार आहेत.
याबाबत आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये तसेच अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांचे प्रशासकीय सेवेत प्रमाण वाढावे, यासाठी आदिवासी विकास विभागाचे मंत्री पाडवी यांनी ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत यूपीएससीच्या पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीची तयारी करणाऱ्या २५ अशा अनुसूचित जमातीमधील एकूण ५० उमेदवारांना ही आर्थिक मदत मिळणार आहे.

वर्षे २०२०-२१ पासून ही योजना लागू होणार असून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत या विद्यार्थ्यांची निवड करून थेट त्यांच्या बँक खात्यात रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे राज्यातील पन्नास आदिवासी विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून ही आर्थिक मदत मिळणार आहे. यामुळे गरजू आणि गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना निश्चितच लाभ होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या