नाशिक जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय ४ जानेवारीपर्यंत संस्थगित

 जगात; देशात कोरोनाची आलेली दुसरी लाट चिंताजनक - पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक दि. २२:- जगभरात कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. देशात, राज्यात दुसऱ्या लाटेची सुरूवात होण्याची चाहुल लागली असून नाशिक जिल्ह्यातही १९ नोव्हेंबरपासून रूग्णसंख्या वाढत असल्याने जिल्ह्यात उद्यापासून शाळा करण्याचा निर्णय ४ जानेवारी २०२१ पर्यंत संस्थगित करण्यात आला असून डिसेंबरच्या अंतिम टप्प्यात फेरआढावा घेतल्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेवून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

ते आज कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबतच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांशी चर्चा करताना बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय्, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त दीपक कासार, नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त मनोज घोडे-पाटील, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रेखा रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपील पवार,अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्त माधुरी पवार, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर, आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रमुख अधिकारी, विद्यार्थी संघटना, पालक संघटना, वृत्तपत्रांचे संपादक यांच्याशी माझी पालकमंत्री या नात्याने साधक-बाधक चर्चा झाली आहे. या चर्चेतूनच जोखीमेची शक्यता पाहता शाळा सुरू न करता तुर्तास संस्थगित ठेवणे योग्य राहिल असा सूर सर्वांचा दिसून आला. जिल्ह्यातील प्रमुख आरोग्य अधिकाऱ्यांनीही डिसेंबर जानेवारी हे महिने बालकांसाठी विविध आजारांनी अतिजोखिमेचे असतात त्यामुळे शाळा सुरू करण्यापूर्वी आपल्याकडे असलेली बालरोगतज्ज्ञांची उपलब्धता, बालरूग्णालये त्यांची कोविड-१९ च्या अनुषंगाने असलेली क्षमता, लागणारे संभाव्य मनुष्यबळ, असलेली व लागणारी वैद्यकीय साधनसामुग्री यांचाही अंदाज घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. आजपर्यंत आपण सर्वसाधारण रूग्णांसाठीच्या कोरोना संसर्गाची लक्षणे व गुणधर्म यावर आधारित आपली आरोग्य सेवाविषयक क्षमतावृद्धी केली आहे. बालकांच्या अनुषंगाने व येणाऱ्या लाटेची गुणधर्म व शक्यतांच्या अनुषंगाने आपण आपल्या क्षमतांची चाचपणी करूनच शाळा सुरू करणेबाबत निर्णय घ्यावा असे वाटते.

शहरी भागातील पालकांमध्ये शाळा सुरू करण्याबाबत फारशी अनुकुलता दिसून येत नाही. तर ग्रामीण भागात ५० टक्के लोकांमध्ये ती अनुकुलता दिसून येते. अशाही परिस्थितीत उद्यापासून शाळा सुरू केल्याच तर, सुट्ट्या वगळता १८ दिवस शाळा सुरू राहतील. त्यात अर्धे विद्यार्थी ९ दिवस आणि उरलेले अर्धे ९ दिवस शाळेत येतील या पार्श्वभूमीवर केवळ ९ दिवसांसाठी शाळा सुरू करण्याची जोखीम का घ्यायची याबाबत चर्चा करताना आपण आस्ते कदम पुढे जाण्याचा विचार करत आहोत, असेही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

जगभरात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. नाशिक जिल्ह्यातही १९ तारखेपासून रुग्णवाढ सुरू झालेली आहे. याचा संबंध दिवाळी बरोबर आहे की जगभरात आलेल्या दुसऱ्या लाटेशी आहे, याबाबत तज्‍ज्ञ सांगतील. मात्र हळूहळू कमी होत असलेली संख्या पुन्हा दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेचे वातावरण नक्कीच आहे. डिसेंबरमध्ये पुन्हा कोरोनाची त्सुनामी येण्याची शक्यता आहे त्यामुळे डिसेंबरच्या शेवटी नाताळच्या सुट्टी संपल्यावर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे ४ जानेवारी 2021 पर्यंत शाळा बंदचा निर्णय कायम राहील, असेही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

पेशंट वाढले तर आहे ते कोविड सेंटर सुरु राहतील आणि गरज पडल्यास आणखीन सेंटर सुरू करण्याबाबत तयारी सुरू आहे असे सांगून श्री. भुजबळ म्हणाले, जिल्ह्यातील सुमारे ४० शिक्षक तपासणीतुन कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून अद्याप काही अहवाल येणे बाकी आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय्, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त दीपक कासार नाशिक महानगरपालिकेचे उपायुक्त मनोज घोडे-पाटील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रेखा रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपील पवार महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर, यांनी चर्चेत सहभाग घेवून आपापल्या विभागाशी संबंधित माहिती सादर केली.
शहिद कुलदीप जाधव यांना श्रद्धांजली !

या बैठकीनंतर बागलाणचे शहिद जवान कुलदीप जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करताना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, जम्मू काश्मीरच्या सीमेवर देशसेवेसाठी तैनात असलेले बागलाणचे सुपुत्र कुलदीप जाधव शहीद झाल्याची दुःखद घटना घडली आहे.कुलदीप जाधव हे गेल्या चार वर्षांपासून सैन्यदलात कर्तव्य बजावत होते. बागलाण तालुक्यातील सटाणा शहरात वास्तव्यास असलेले मूळचे पिंगळवाडे गावचे सुपुत्र कुलदीप यांनी आपलं शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कठोर मेहनत घेऊन ते भारतीय सैन्यदलात दाखल झाले होते. जम्मू काश्मीरच्या राजोरी सेक्टरमध्ये प्रचंड रक्त गोठविणाऱ्या थंडीत ते देशसेवेचे कर्तव्य बजावत असतांना शहिद झाले. त्यांच्या निधनाने भारत मातेने एक वीर सुपुत्र गमावला आहे. जाधव कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असून राज्यशासनाच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने