१४,२३३ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी १ डिसेंबरला होणार प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

मुंबई, दि. 22:- राज्यभरातील 14 हजार 233 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 1 डिसेंबर 2020 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यावर 7 डिसेंबर 2020 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 10 डिसेंबर 2020 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.
श्री.मदान यांनी सांगितले की, एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या/ नवनिर्मित 1 हजार 566; तसेच जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधित मुदत संपणाऱ्या/ नवनिर्मित 12 हजार 667 अशा एकूण 14 हजार 233 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी या मतदार याद्या तयार केल्या जातील. यातील एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविडची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता; तर 19 नोव्हेंबर 2020 रोजी ही संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच रद्द करण्यात आली. या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2020 पर्यंत अद्ययावत केलेल्या विधानसभेच्या मतदार याद्यांवरून ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या. विधानसभेच्या या मतदार याद्या 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित होत्या; परंतु भारत निवडणूक आयोगाने आता 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदार याद्या 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केल्या आहेत. मतदार याद्यांत नाव नोंदविलेल्या सर्वांना मतदान करता यावे किंवा निवडणूक लढविता यावी, हे लोकशाहीचे मुलभूत तत्त्व आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमासह 5 फेब्रुवारी 2020 च्या आदेशान्वये तयार केलेल्या मतदार याद्यादेखील रद्द केल्या होत्या. आता निवडणूक प्रक्रिया रद्द झालेल्या ग्रामपंचायतींसह एकूण 14 हजार 233 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदार याद्यांचा हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

विधानसभा मतदारसंघाच्या 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येतील. त्या आधारावर तयार करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. या प्रारूप मतदार याद्यांवर तेंव्हापासून 7 डिसेंबर 2020 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात. हरकती व सूचनांसंदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 10 डिसेंबर 2020 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, असेही श्री. मदान यांनी सांगितले.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने