मुलीच्या अंत्यविधीची तयारी चालू असतानाच धडकले मुलगाही दगावल्याचे वृत्त.....

हिंगोली, दि. २३:- १३ महिन्याच्या मुलीचा अज्ञात कारणांमुळे मृत्यू झाल्यानंतर आज सकाळी तिच्या अंत्यविधीची तयारी चालू असतानाच ३ वर्षांचा मुलगाही दगावल्याची वृत्त गावात धडकले आणि एकच खळबळ उडाली. यानंतर मुलीच्या अंत्यविधीचा कार्यक्रम रद्द करून नातेवाईकांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आखाडा बाळापूर तेथे रुग्णालयात नेला. तर मयत मुलाचे शवविच्छेदन हदगाव येथे करण्यात आले.
कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल येथील हे मृत्यु पावलेले बहीण भाऊ आहेत. दोघे भाऊ-बहीण आईसोबत हादगाव तालुक्यात कवळी तेथे ३ दिवसांपूर्वी मामाच्या गावी गेले होते. आराध्या अमोल शिंदे मुलीचे तर आर्यन अमोल शिंदे असे मयत मुलाचे नाव आहे. गुरुवारी रात्री जेवण झाल्यावर मुलगा आणि मुलीला उलट्या होण्यास आणि चकरा, येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्यांना हादगाव तालुक्यातील निवगा येथे नेण्यात आले. परंतू रुग्णालय सुरू नसल्याने आणि मुलीची प्रकृती बिघडत असल्याने मुलीला रात्रीच आखाडा बाळापूर तेथे रूग्णालयात आणण्यात येत असताना तिचा मृत्यू झाला. तिकडे मुलाची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्याला हदगाव येथे उपचारासाठी नेण्यात आले. तर इकडे डोंगरगाव पूल येथे आज सकाळी मुलीच्या अंत्यविधीची तयारी चालू असतानाच मुलाचा सुद्धा मृत्यू झाल्याची बातमी धडकली. मुलगा आणि मुलीचा मृत्यू एकाच वेळेस कसा काय झाला? या प्रश्नामूळे मुलीचे वडील आणि ग्रामस्थांनी अंत्यविधी करण्याचा कार्यक्रम थांबवून मुलीचा मृतदेह आखाडा बाळापूर येथे उत्तरीय तपासणीसाठी नेला. आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया पार झाली. तर मुलाच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी हदगाव येथे करण्यात आली.

आखाडा बाळापूर येथे झालेल्या मुलीच्या उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्या नाही. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. पोलीस या घटनेचा शोध घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या