डीएम रिपोर्ट्स/हिंगोली- तालुक्यातील कानडखेडा बुद्रुक येथे आदिवासी समाजातील मुलीला गुंगी येण्याचे औषध देऊन तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत गोरेगाव पोलीस ठाण्यात पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून कानडखेडा बुद्रुक येथील गोपाल सतीश पुरी या आरोपीविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत गोरेगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर २०१८ ते ऑगस्ट २०२० पर्यंत सदर मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. तू मला खूप आवडतेस, मी तुझ्यावर प्रेम करतो असे म्हणून आरोपीने सदर मुलीला प्रेमजालात अडकविले. त्यानंतर तिला गुंगी येण्याचे औषध मिसळलेली गोड सुपारी खाण्यास देवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर पुन्हा वारंवार तिचा लैंगिक छळ करण्यात आला. दरम्यानच्या काळात आरोपीचे लग्न झाल्यानंतरही त्याने ऑगस्ट २०२० मध्ये सुद्धा तिच्यावर बलात्कार केला. तसेच कुणाला सांगितले तर जिवे मारण्याची धमकी दिली.
३ सप्टेंबर २०२० रोजी आरोपीने रात्री ११.३० ते १२ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीला घराबाहेर बोलवून तिला मोटारसायकलवर जबरदस्ती बसविले आणि नंतर गुंगीचे औषध देऊन तिला एका खाजगी बसमध्ये बसवून दिले. बसमध्ये बसवून देत असताना तिच्या मोबाईल मधील सिम कार्ड काढून आरोपीने दुसरे सिमकार्ड त्यात टाकले. सदर मुलगी दुसऱ्या दिवशी दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास चंद्रपूर येथे पोहोचली. त्या ठिकाणी तिला मोबाईलवर एका मुलीचा फोन आला आणि त्या मुलीने पीडितेला रिक्षात बसून एका घरात नेले आणि तिला रात्री आठ वाजेपर्यंत कोंडून ठेवले. त्यानंतर रात्री तिला एका कारखान्यात नेण्यात आले त्याठिकाणी काही व्यक्तींनी तिची पाहणी केली आणि तिला तेथून पळून न जाण्याची धमकी दिली.
१० वर्षांपूर्वी पीडिता झाली अनाथया घटनेतील पीडित मुलीचे आई-वडील १० वर्षांपूर्वी मृत्यू पावले आहेत. तिला एक १२ वर्षांची लहान बहिण असून या दोन्ही बहिणींचे पालनपोषण तिचे काका करतात. सदर मुलीला आई वडील नसल्याचा गैरफायदा घेत आरोपीने हे कृत्य केले आहे. विशेष म्हणजे आरोपीच्या भावावर सुद्धा वाशीम जिल्ह्यात असाच गुन्हा दाखल झाला आहे. त्यानेसुद्धा आदिवासी मुलीचे शोषण केले आहे.
दरम्यानच्या काळात पीडितेच्या काकांनी कनेरगाव नाका पोलीस चौकी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. विशेष म्हणजे यावेळी या प्रकरणातील आरोपी सुद्धा पीडित मुलीच्या नातेवाईकांसोबत होता. पीडितेच्या काकांनी गोपाल संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी गोपालची चौकशी सुरू केली आणि प्रकरण समोर आले. सदर मुलगी चंद्रपूर येथे असल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी मी त्याला चंद्रपूर येथून सोडवून आणले. मुलीची मुक्तता केल्यानंतर तिला तिच्या काकाच्या ताब्यात देण्यात आले. विशेष म्हणजे एवढ्या गंभीर प्रकरणात गोरेगाव पोलिसांनी आरोपीवर कोणतीही कारवाई न करता त्याला सहीसलामत सोडले. परंतु पीडितेच्या काकांनी आदिवासी पॅंथर संघटनेचे प्रमुख प्रशांत बोडखे यांना माहिती सांगितल्यानंतर त्यांनी हे प्रकरण उचलून धरले आणि त्यामध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे.