केरळच्या महात्मा गांधी विद्यापिठाच्या अभ्यासक्रमात प्रा. संध्या रंगारी यांच्या कवितांचा समावेश

देशपातळीवरील निवडक कविंमध्ये समावेश होणार्‍या मराठीतील एकमेव कवयित्री..... 

डीएम रिपोर्ट्स/हिंगोली- मराठीतील प्रसिद्ध कवयित्री तथा ललित लेखिका प्रा. संध्या रंगारी यांच्या कविता केरळ येथील महात्मा गांधी विश्वविद्यालयाच्या एम. ए. हिंदीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्या आहेत. भारतीय भाषांमधील निवडक ८ दिग्गज कवींमध्ये समावेश होणार्‍या मराठी भाषेतील या एकमेव कवयित्रि असून त्यांच्या काव्यांच्या निवडीमुळे मराठी साहित्य विश्वात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील नारायणराव वाघमारे महाविद्यालयात मराठी विषयाचे अध्यापन करणाऱ्या मराठीतील प्रसिद्ध कवयित्री प्रा. संध्या रंगारी यांच्या दर्जेदार कवितांवर पुन्हा एकदा देशपातळीवर शिक्कामोर्तब झाले आहे. केरळ राज्यातील महात्मा गांधी विश्वविद्यालय कोटेम यांच्या एम. ए. हिंदी या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कवयित्री प्रा. संध्या रंगारी यांच्या दोन कवितांचा समावेश करण्यात आला आहे. प्रसिद्ध अनुवादक डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांनी कवयित्री संध्या रंगारी यांच्या मराठी कवितांचा हिंदी अनुवाद केला असून ' बेटी को बोलना सिखाऊंगी ' हे हिंदी कवितांचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्या पुस्तकातील दोन कवितांचा समावेश केरळ विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.

एकमेव मराठी कवयित्रि....

अत्यंत दर्जेदार असलेल्या केरळच्या या अभ्यासक्रमात मराठीतील एकमेव कवयित्री प्रा. संध्या रंगारी यांच्या कवितांचा सन्मान झाला आहे .' भारतीय साहित्य ' या अभ्यासक्रमासाठी देशपातळीवरील एकूण आठ कवींच्या कवितांचा समावेश केला आहे. त्यात पंजाबी कवयित्री अमृता प्रीतम, उर्दू कवी निदा फाजली, मराठी कवयित्री संध्या रंगारी, आसामी कवी नीलिमकुमार, तमिळ कवी पेरुमाल मुरुगण, बंगाली कवी जीवनानंदन दास, राजस्थानी कवी नीरज दहिया आणि हिंदी कवी अवतार सिंह "पाश" यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे.
देशपातळीवरील या निवडक कवींमध्ये मराठीतील कवयित्री प्रा. संध्या रंगारी यांच्या कवितांचा समावेश झाल्याने त्यांच्या कवितांच्या दर्जावर देशपातळीवर शिक्कामोर्तब झाले आहे. अनुवादक डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांच्या हिंदी अनुवादामुळे या कविता देशभर पोहोचल्या असून देशाच्या विविध भागात त्यांच्या कवितांना वाचक मिळाले आहेत. केरळ राज्यातील लाखो विद्यार्थी आता पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या कवितांचा अभ्यास करणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर या भागात राहणाऱ्या या ग्रामीण भागातील कवयित्रीच्या साहित्यिक वाटचालीत हा एक मानाचा तुरा प्राप्त झाला आहे.

त्यांच्या या यशाबद्दल छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.कृष्णराव पाटील जरोडेकर प्रभारी प्राचार्य डॉ. सुधाकर इंगळे सह अनेकांनी अभिनंदन केले आहे. यापूर्वीही बडोदा येथील महाराजा सयाजीराव गायकवाड विश्वविद्यालय गुजरात येथे बी.ए. च्या अभ्यासक्रमासाठी त्यांच्या 'चांदणचुरा' या ललित संग्रहाचा समावेश करण्यात आला आहे. तर मुंबई विद्यापीठ, नांदेड विद्यापीठ ,औरंगाबाद विद्यापीठातही त्यांच्या कविता अभ्यासक्रमात समाविष्ट झालेल्या आहेत. आता देशपातळीवरील या अभ्यासक्रमात त्यांच्या कवितांची निवड झाल्याने मराठीच्या कक्षा ओलांडून हिंदी भाषिक पट्ट्यातही मराठी कविता अभ्यासल्या जात आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या