खोप्यामधी खोपा सुगरणीचा..... अरे शिंप्यानेही पिलांसाठी झोका पानाले बांधीला

रावण धाबे
डीएम रिपोर्ट्स/हिंगोली- अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिन झोका झाडाले टांगला ! पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलामधी जीव, जीव झाडाले टांगला ! अशी बहिणाबाईंची कविता बालपणी बहुतांश सर्वच मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी वाचलेली असतेच. निसर्गाने सर्वच सजीवांना जीवन जगण्याचे आणि त्यातही आपल्या पिलांची सुश्रुषा करण्याची अकल्पकता, अफलातून शक्ती मातेला दिलेली असतेच. अशीच कल्पकता, नैसर्गिक देणगी शिंपी जातीच्या चिमणीलाही मिळाली असून खोप्यामधी खोपा सुगरणीचा..... अरे शिंप्यानेही पिलांसाठी झोका पानाले बांधीला, अशा ओळी एखाद्या निसर्गप्रेमीला सुचल्याशिवाय राहणार नाहीत ! 
हिंगोली शहरातील गारमाळ भागातील एका घराच्या आवारात असलेले घरटे... 
आपल्याला सर्वत्र आढळून येणार्‍या शिंपी नावाच्या इवल्याश्या चिमणीने सुद्धा असा काही अभिजात स्थापत्य कलाविष्कार सादर सादर केला आहे, की पाहणार्‍यांना हेवा वाटावा असाच. ५० ग्रॅम वजनापेक्षाही कमी वजन असलेल्या या शिंप्याला मिळालेले हे एक नैसर्गिक वरदानच आहे. तयार केलेल्या घरामागे, आपल्या बच्चे कंपनीचे ते घराबाहेर पडण्यापर्यंत संरक्षण व्हावे, शिकर्‍यांना ते पाने आहेत की घरटे याचा थांगपत्ताच लागू नये अशी काहीशी संकल्पना यामागे असावी. परंतु, जवळून आणि कुतुहलाने पाहील्यास इवल्याशाया या जिवाच्या अत्यंत छोट्याश्या मेंदूत ही कल्पना आलीच कशी?, कापड शिवून जसा सदरा शिवावा असे दोन-चार पानांना शिवून आपल्या चिल्यापिल्यांसाठी हंगामी घर तयार करण्याची शक्कल लढविलीच कशी? असे प्रश्नही निसर्गप्रेमींना पडल्याशिवाय राहणार नाहीत.

झाडाची दोन-चार पाने एकमेकांना एखाद्या तांब्याच्या आकारात शिवून त्याच्यामध्ये पंखांचे तुकडे, गवताची गादी तयार केलेली, आत-बाहेर येण्या-जाण्यासाठी छोटेसे द्वार, आणि दरवाजातून घरात पाणी येवू नये यासाठी त्यावर पानाचीच एक झापडी, बांधण्यात आलेले घरटे दाट पानांच्या मधोमध अशी काहीशी रचना असलेले हे घरटे म्हणजे शोधनिबंध लिहिण्याचा मोठा विषयच! 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या