परभणीचे खासदार संजय जाधव यांचा राजीनामा; कार्यकर्ते आणि मतदारांना मूर्ख बनवण्यासाठी स्टंटबाजी...?

डीएम रिपोर्ट्स- परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळाच्या मुद्द्यावरून खासदारकीचा राजीनामा दिला आहे. कायदीय तरतुदीनुसार, एखाद्या खासदाराला आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यायचा असल्यास त्याला तो लोकसभा सभापती यांच्याकडे द्यावा लागतो. परंतु जाधव यांनी राजीनामा राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे खासदार जाधव यांचा राजीनामा म्हणजे पक्षावर दबाव आणण्यासाठी व शिवसैनिक आणि मतदारांना मूर्ख बनवण्यासाठीची केवळ स्टंटबाजी असल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसून येत आहे.
जिंतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी गेल्या ८ ते १० महिन्यापासून खासदार संजय जाधव प्रयत्नशील आहेत. परंतु या बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांना काटशह देत जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त केले आहे. विशेष म्हणजे या बाजार समितीवर दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचेच प्रशासकीय प्रशासक मंडळ शासकीय प्रशासक मंडळ नेमले गेले असल्याने शिवसैनिकांना संधी मिळाली नाही. यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर आपण शिवसैनिकांना न्याय देऊ शकत नसल्याच्या मुद्द्यावरून खासदार संजय जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे. या राजीनामा पत्रात त्यांनी नमूद केले आहे की भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि अनेक नगरसेवक शिवसेनेत येण्यासाठी चूक आहेत. परंतु आपण शिवसैनिकांनाच न्याय देऊ शकत नाही. तर पक्षात नवीन आलेल्या लोकांना कसा न्याय देणार? असा प्रश्न उपस्थित करून खासदार जाधव यांनी आपण लोकसभा मतदारसंघात किती सक्रिय आहोत, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

माजी आमदार राहिलेले आणि सध्या खासदार असलेले तसेच गेल्या २० वर्षांपासून राजकारणात असलेल्या संजय जाधव यांना लोकप्रतिनिधी पदाचा राजीनामा कोणाकडे द्यायचा असतो, हे सुद्धा माहिती नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावयाचा असेल तर त्यांनी तो लोकसभा सभापतींकडे सादर करणे आवश्यक आहे. परंतु तसे न करता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा आपल्या पक्षप्रमुख आकडे पाठवून दिला आहे. त्यामुळे एक तर त्यांची खासदारकी वाचणार आहे आणि पक्ष प्रमुखांकडून त्यांची समजूत सुद्धा काढली जाणार आहे आणि हे प्रकरण पुढे शांत होणार आहे, हे स्पष्ट दिसून येत आहे. असे असतानाही त्यांनी उपसलेले राजीनाम्याचे हत्यार हे केवळ शिवसैनिकांनी लोकसभा मतदारसंघातील मतदारांना केवळ मूर्ख बनवण्यासाठी उपसले असल्याचे दिसून येत आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

1 टिप्पण्या

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने