परिवर्तनाचे दृश्य परिणाम: मराठा, बहुजन समाजाकडून महालक्ष्मी ऐवजी जिजाऊ-सावित्रीच्या प्रतिमांचे पूजन

डीएम रिपोर्ट्स
वसमत/डॉ. नागोराव जांबूतकर- वसमत येथील उच्चशिक्षित दळवी परिवाराच्या वतीने मागील १० वर्षांपासून गौरी, महालक्षी, गणपती स्थापना करण्याऐवजी घरात माता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा, अर्धकृती पुतळ्यांचे पूजन करण्याची परंपरा अखंडितपणे पाळली जात आहे. मराठा सेवा संघाने सुरू केलेल्या संस्कृतिक, धार्मिक परिवर्तनाच्या लढ्याचे हे दृश्य स्वरुपातील फलित असून इतर बहुजन बांधवांनी सुद्धा हा बदल स्वीकारण्याची गरज निर्माण झाली आहे.
माता जिजाऊ, माता सावित्री यांच्या पुतळ्यासमोर कृषी प्रधान संस्कृतीची आरास. छाया: नागेश चव्हाण, वसमत.
मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर, डॉ. आ. ह. साळुंके यांच्या प्रेरणेतून आणि शिवधर्माच्या संहितेनुसार पारंपरिक गौरी पूजनाच्या ऐवजी वसमत येथील नामदेव दळवी आणि त्यांच्या पत्नी मीना दळवी यांनी त्यांच्या घरी राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धकृती पुतळ्यांची पूजा करून समाजाला नवपरीवर्तनाचा जणू संदेशच दिला आहे. मागील १० वर्षांपासून अशाच पद्धतीने हा सण ते साजरा करतात. शिक्षणामध्ये गौरी ह्या कोण आहेत? त्यांचा इतिहास काय आहे? आणि मानवी जीवनात त्यांचे योगदान काय आहे? या प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळाली नाहीत. त्यामुळे त्यांनी ज्या दोन मातांनी प्रत्येकाचे आयुष्य घडविले अशा जीवंत मातांचा सन्मान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्या माता म्हणजेच माता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले! राष्ट्रमाता जिजाऊ यांनी या देशाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज असे दोन युगपुरुष दिले. ज्यांच्या माध्यमातून पुढे त्यांनी बहुजनांचे स्वराज्य उभे केले आणि  इथल्या पीडित शोषितांना न्याय दिला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी या देशातील महिलांना शिक्षणाची दारे खुली केली. सावित्रीबाई फुले यांचा जन्मच झाला नसता तर, कदाचित या देशातील महिला गुलाम म्हणून जगल्या असत्या. केवळ चूल आणि मुल, या पलीकडे त्यांचा इतिहास गेला नसता.

त्यामुळे या दोन महिला चारित्रांचा अभ्यास करून वसमत येथील परिवर्तनवादी नामदेव दळवी आणि मीना दळवी या दांपत्याने त्यांच्या घरी या आधुनिक मातांचे पूजन करून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यास सुरुवात केली. यावर्षीही त्यांनी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.  परांपरिक गौरी नाकारून त्यांनी या आधुनिक गौरीसमोर त्यांनी आरास म्हणून कृषी परंपरेतील साज ठेवले होते. तसेच समग्र भारतीयांचे श्रद्धास्थान असलेले भारताचे संविधान, जगतगुरू तुकाराम महाराज यांची गाथा, संत नामदेवांची गाथा, भगतसिंग यांचे जीवन चरित्र  या आणि अशा अनेक ग्रंथा ची आरास त्यांनी मांडली होती. विशेष म्हणजे हे दोन्ही दाम्पत्य उच्चविद्याविभूषित असून त्यांची वसमत तालुक्याच्या ठिकाणी एक शिक्षण संस्थाही आहे. या संस्थेच्या माध्यमातूनही ते बहुजन समाजाला, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करतात.

बहुजन समाजातील अनेक घटक आजघडीला देवधर्माच्या मागे लागून त्यांचा खरा इतिहास विसरून जात आहेत. ज्ञानार्जन करून चिकित्सा करण्यापेक्षा ते भाकडकथांच्या तालावर नाचत आहेत. त्यामुळे त्यांचे नुकसान तर होत आहेच; शिवाय देशाची पिढी बरबाद होत आहे. अशा स्थितीत, बहुजन समाजातील सर्वात मोठा घटक, मराठा समाज पारंपारिक बौद्धिक गुलामीची झुगारून, शिव-फुले-शाहू-आंबेडकरवादी विचारांची कास धरित असल्याने, समाजात मोठे परिवर्तन होत असल्याचे दिसून येत आहे. यावर्षीही हिंगोली जिल्ह्यात मराठा आणि इतर ओबीसी बहुजन समाजात मोठ्या प्रमाणात गौरीला स्पष्टपणे नाकारून, जिजाऊ-सावित्रीचे पूजन करण्यात आले.

आवडल्यास शेअर करा.... सूचना, आक्षेप असल्यास कॉमेंट द्या... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या