लॉकडाऊन उधळून लावण्याचा इशारा देणाऱ्या वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

डीएम रिपोर्ट्स- हिंगोली जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि संचारबंदीला विरोध करून लॉकडाऊन उधळून लावण्याचा इशारा देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या नेते आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी ६ ते १९ ऑगस्ट दरम्यान जाहीर केलेल्या टाळेबंदीला विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ४ ऑगस्ट रोजी हिंगोली शहरातील गांधी चौक संविधान कॉर्नर येथे आंदोलन केले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपण लॉकडाऊन पाळणार नाही अशा घोषणा दिल्या होत्या. या प्रकाराची दखल घेत हिंगोली शहर पोलिसांनी याबाबत वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांवर रात्री उशिरा गुन्हे दाखल केले आहेत.   पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा १८८ अंतर्गत रविंद्र वाढे, ज्योतीपाल रणवीर, जिल्हाध्यक्ष वसिम अहेमद देशमुख, बबन  भूक्तर, योगेश नरवाडे, सुनंदाताई वाघमारे, विक्की काशीदे, शेख गण्णी आदी १२ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

तर आता उद्या प्रत्यक्ष ६ ऑगस्ट २०२० रोजी लॉकडाऊन दरम्यान वंचित आघाडीचे कार्यकर्ते आणि नेते लॉकडाऊन कशाप्रकारे उधळून लावतात आणि पोलीस आणि जिल्हा प्रशासन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांना कसे अटकाव घालतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या