ताईंच्या लग्नाला जायचं हाय... फिजिकल डिस्टंसिंगचे नियम तोडणाऱ्या ५०० वर वऱ्हाडींवर होणार गुन्हे दाखल

पोलीस आणि अधिकारीही पोहचताच झाली पळापळ, सर्वांवर होणार गुन्हे दाखल

सुधाकर मल्होत्रा
डीएम रिपोर्ट्स- हिंगोली तालुक्यातील बोरजा येथे आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास दोन बहिणींचे एकाच मंडपात लग्न लागले. दोन्ही ताईंच्या लग्नाला जायचं हाय... जायचं हाय म्हणत तब्बल ५०० पेक्षा अधिक वऱ्हाडी मंडळी पोहचली. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर लग्नासाठी केवळ ५० लोकांची परवानगी असताना एवढे मोठी जत्रा भरविण्यात आल्याची कुणकुण प्रशासनाला लागली आणि काही वेळातच बासंबा पोलिसांसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार लग्नघरी दाखल झाले आणि मग झाली वऱ्हाडी मंडळींची पळापळ. फिजिकल डिस्टंसिंग, मास्क वापरण्याच्या सक्तीची ऐशीतैशी करणाऱ्या या लग्न सोहळा आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असून याबाबत प्रकीया चालू आहे. 

कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लग्नविधी, अंत्यविधीसाठी मोजक्याच लोकांना सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आजघडीला होणारे लग्न समारंभ सुमारे ५० माणसांच्या उपस्थित किंवा त्यापेक्षाही कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये होत आहेत. असे असताना आज सकाळी हिंगोली तालुक्यात येणाऱ्या आणि बासंबा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बोरजा येथे आज दोन सख्ख्या बहिणींचे लग्न मोठ्या गाजावाज्यात पार पडले. या दोन्ही बहिणींच्या लग्नाला दोन्ही नवरदेवांची वऱ्हाडी मंडळीही पोहचल्याने, लग्नात सहभागी होणाऱ्यांची संख्या जास्तीत जास्त १०० च्या घरात असणे अपेक्षित असताना, त्याठिकाणी सुमारे ५०० पेक्षा जास्त वऱ्हाडी मंडळी जमली आणि या कार्यक्रमात फिजिकल डिस्टंसिंग, मास्क वापरण्याच्या सक्तीची ऐशीतैशी होत असल्याची माहिती बासंबा पोलिसांना मिळाली.
त्यानंतर बासंबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मालपिल्लू यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्याच बरोबर हिंगोलीचे उपविभागीय दंडाअधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार गजानन शिंदे यांच्यासह महसूल विभागाचे पथकही दाखल झाले. पोलिसांची जीप पाहताच अनेक वऱ्हाडी मंडळींनी रस्ता मिळेल त्या दिशेने पलायन केले आणि स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु याबाबत कोणालाही सोडणार नाही आणि या कार्यक्रमास जबाबदार असणारे आणि फिजिकल डिस्टंसिंग न पाळणारे, मास्क न वापरणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे उपविभागीय अधिकरी अतुल चोरमारे यांनी सांगितले. या लग्न समारंभात काही राजकीय मंडळीही दाखल झाली होती, अशी माहिती आहे.

हे ही वाचा___ नेपाळने घातली भारतीय खाजगी मीडियावर बंदी Nepal Bans Private Indian News Channel

लेटेस्ट अपडेट- उशिरापर्यंत गुन्हा दाखल नाही......... 

सरपंच, पोलीस पाटलांचे जबाब नोंदविले; उशिरापर्यंत गुन्हा दाखल नाही
दरम्यान, याबाबत बासंबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मालपिल्लू यांनी सांगितले,  की महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्याकडून अद्याप फिर्याद देण्यात आली नाही किंवा चौकशी अहवाल प्राप्त झाला नाही. त्यामुळे गुन्हा दाखल झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
तर याबाबत उपविभातीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी सांगितले, की गटविकास अधिकारी, हिंगोली यांच्याकडे प्रकरणाची चौकशी देण्यात आली आहे. त्यांनी चौकशी केल्यानंतर जो अहवाल येईल त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. अद्याप त्यांनी अहवाल दिला नसल्याने गुन्हा दाखल झाला नाही, असेही चोरमारे यांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणात घेण्यात आलेले पोलीस पाटील आणि सरपंच यांचे जबाब या लग्न समारंभात मर्यादेपेक्षा जास्त लोक असल्याच्या बाबीला पुष्टी देणारे नसल्याचे समजते. त्यामुळेही गुन्हा दाखल होण्यास उशीर होत आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

We received your comment; we will reply shortly after moderating your message.
Thanks.
Yours, Raavan Dhabe

थोडे नवीन जरा जुने