पतंगाच्या मांज्यात अडकला होता पक्षी
डीएम रिपोर्ट्स- येथील गांधी चौकात आज कर्तव्य बजावत असताना येथील शहर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी वसंत चव्हाण यांना विजेच्या तारांना गुंडाळलेल्या मांजात कबुतर पक्षी अडकला असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी मोठा शिताफीने या पक्षाला वाचविले असून एका मुक्या प्राण्याला चव्हाण यांच्या सामाजिक जबाबदारीमुळे जीवदान मिळाले आहे.
![]() |
पक्षाला वाचविताना पोलीस कर्मचारी वसंत चव्हाण.↑ |
मकर संक्रातीच्या दिवशी पतंग उडविण्याची प्रथा आहे. अलीकडील काळात पतंगासाठी लागणार मांजा चिनी बनावटीचा कमी पैश्यात जास्त मिळत असल्याने तोच मांजा वापरला जात आहे. परंतु हाच मांजा मुक्या जीवांसाठी गळ्याचा फास ठरत आहे. कारण हा मांजा नायलॉन दोऱ्याचा (China Made Nylon Kite Thread) असून तो सहजासहजी तुटत नाही. शिवाय हा मांजा कित्येक दिवस नाश पावत नसल्याने तो घातक ठरत आहे. झाडे, विजेच्या खांबावर गुंडाळलेल्या या मांज्यात अडकून पक्षी, प्राणी आपले प्राण गमावत असल्याचे नेहमीच दिसून येते. अशीच घटना आज हिंगोली शहरातील गांधी चौकात दुपारी ५ वाजता घडली. एक पक्षी विजेच्या तारांजवळ घिरट्या मारत होता. जवळून पाहिले असता या पक्षाचे पाय विजेच्या तारांना गुंडाळलेल्या मांज्यात अडकल्याचे दिसून आले. त्याठिकाणी कर्त्यव्य बजावत असलेले येथील शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी वसंत चव्हाण यांनी, दिरंगाई न करता, एक बांबू मागवून घेतला आणि मोठ्या शिताफीने मांज्या कापून टाकला. मांजा कापला जाताच, पक्षाने आकाशात भरारी घेतली आणि त्याचा जीव वाचला.
अशा प्रकारच्या बऱ्याच घटनांमध्ये मांजात अडकलेला प्राणी, पक्षी सुटकेसाठी संघर्ष करीत असतांना आपल्या पाय, पंखांना झटके देतो आणि याच संघर्षात त्याचे अवयव या मांजामुळे कापले जातात. रक्तबंबाळ होऊन त्यांना शेवटी प्राण गमवावे लागतात.