महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय कृती संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले आश्वासन....
डीएम रिपोर्ट्स- गेल्या १९ वर्षांपासून कायम विनाअनुदान तत्त्वावर काम (सध्या अनुदानास पात्र) करणाऱ्या राज्यभरातील शिक्षकांना तात्काळ वेतन देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय कृती संघटनेच्या शिष्टमंडळाने हिंगोलीच्या पालकमंत्री तथा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सकारात्मक प्रतिसाद देत वकरच या सर्व शाळा आणि शिक्षकांचा प्रश्न मार्गी काढू असे आश्वासन दिले आहे.
याबाबत संघटनेच्यावतीने पालकमंत्री तथा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यात आलेल्या निवेदनानुसार, राज्यात गेल्या १९ वर्षांपासून विनावेतन काम करणारे उच्च माध्यमिक शिक्षक बांधवाना अजून त्यांच्या हक्काचा पगार नाही. तेव्हा शासनाने १३ सप्टेंबर २०२९ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार अनुदानास पात्र १६३८ शाळा व १४६ उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय यांना पात्र करून अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनुदानाची पुरवणी मागणी मान्य करून रुपये १०६ कोटी ७४ लाख हे मंजूर झाले आहे. पण अनुदान वितरणाचा शासन निर्णय बाकी असून. राज्यात आलेल्या कोरोनाच्या संकटाचा सामना आता कशाप्रकारे करायचा व या पंधरा दिवसांत जवळपास सहा शिक्षक बांधवणी आत्महत्या केल्या आहेत. तेव्हा पात्र घोषित उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय यांचा अनुदान वितरणाचा शासन निर्णय काढून राज्यातील २२ हजार ५०० प्राध्यापक बांधवाना न्याय द्यावा.
तसेच जे अघोषित उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालय आहेत यांना घोषित करून अनुदान द्यावे. त्याचबरोबर आता या अनुदान वितरणाचा शासन निर्णय काढण्यासाठी वित्त विभागाने लादलेली बिंदू नामावलीची अट रद्द करावी आणि तात्काळ शिक्षकांच्या हक्काचं पगार त्यांच्या खात्यात जमा करावा, आणि शिक्षक लोकांना लवकर न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती संघटनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष प्रा. आशिष इंगळे यांनी शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांची भेट घेऊन मागणी केली. यावेळी शिक्षणमंत्री गायकवाड यांनी ठोस आश्वासन देताना सांगितले, की राज्य शासनाला हा प्रश्न काही करून निकाली काढायचा आणि प्राध्यापक वर्गाला न्याय द्यायचा आहे. तेव्हा येणाऱ्या काळात प्रचलित नियमानुसार अनुदान मिळेल. तसेच शिक्षण विभागाचे सिद्ध सर्वच प्रश्न मार्गी लावायचे असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सुनील जगताप यांच्यासह शिक्षक संघटनेचे सदस्य उपस्थित होते.