ड्रॅगन फ्रुट व शेवगाच्या शेती फळबागेतून ३ लाख रुपये एकरी उत्पन्न
![]() |
ड्रॅगन फ्रुट |
सिकंदर पठाण
डीएम रिपोर्ट्स/गोरेगाव- औषधी गूण असणाऱ्या 'ड्रॅगन फ्रुट'चे उत्पादन घेण्याचा पहिलाच प्रयोग हिंगोली जिल्ह्यात यशस्वी करण्यात आला असून या नवीन प्रयोगातून सेनगाव तालुक्यातील मौजे गोंधनखेडा या गावातील रमेश जाधव या शेतकऱ्यांनी एकरी ३ लाख रुपये उत्पन्न घेतले आहे.
सेनगाव तालुक्यातील गोंदणखेडा येथे ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेण्याचा एक आगळा-वेगळा कृषी उपक्रम राबवला आहे. प्रयोग करणारे शेतकरी रमेश जाधव यांच्याकडे आठ एकर शेती असून जिद्द, चिकाटी आणि वेगळा उपक्रम राबविण्याच्या आपल्या धाडसी वृत्तीमुळे हिंगोली जिल्ह्यातील पहिली ड्रॅगन फ्रुट फळबाग फुलवण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले आहे. एका एकरामध्ये एकूण ५२० खांब उभे करून एका खांबावर ४ ड्रॅगन फ्रुटचे रोपे असे २१०० रोपटे लावण्यात आले. ते गेल्या ३ वर्षापासून ड्रॅगन फ्रुटची फळबाग फुलवीत आहेत. ड्रॅगन फ्रुटच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात त्यांनी चांगले उत्पन्न घेतले आहे. नवीन प्रयोग करण्याची ही संकल्पना सध्या महाराष्ट्र ४ जिल्ह्यायामध्ये आढळून आली आहे. औरंगाबाद येथील रमेश पोखर्णा यांच्या शेताला रमेश जाधव यांनी भेट दिली असता, तेथे त्यांना ड्रॅगन फ्रूट मळा दिसला. त्या माध्यमातून तिथून ती संकल्पना मनात घेऊन त्यांनी आपल्या गावातही आपण ड्रॅगन फ्रुट घेऊ शकतो, असा निश्चय करून त्यांनी आपल्या १ एकरामध्ये ड्रॅगन फ्रुट रोपटे लावून त्याची जोपासना केली. या रोपट्यांना लागणारे जास्तीत जास्त ४० अंश तापमान लक्षात घेता त्यांना सावली मिळण्यासाठी एका रोपट्यामागे एक शेवग्याचे झाड सुद्धा या शेतकऱ्याने लावून दुहेरी उत्पन्न घेण्याचे काम केले आहे.
![]() |
ड्रॅगन फ्रुटची फळ बाग |
औषधी गुणधर्म असलेले फळ
ड्रॅगन फ्रुट विषयी माहिती देताना शेतकरी यांनी सांगितले, की ड्रॅगन फ्रुट हे अनेक आजारांवर उपयोगी फळ असून दमा, बिपी, शुगर अशा विविध रोगावर उपायकारक आहे. या झाडांना केवळ सेंद्रिय खत देण्यात येत असून कुठल्याही प्रकारचे केमिकल्स किंवा रासायनिक खत वापरण्यात आले नाही. त्यामुळे या फळांचा माणसाच्या आयुष्यावर हानीकारक परिणाम होत नाहीत. ड्रॅगन फ्रुटची मागणी जिल्ह्यात आणि मराठवाड्यत मोठ्या प्रमाणात होत असून, आता पुढील वषापासून हे फळ देशाबाहेर निर्यात करायचे आहे, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रामध्ये खूपच कमी म्हणजे जवळपास चार जिल्ह्याच्या क्षेत्रामध्ये ठिकाणी ड्रॅगन फ्रुटचे उत्पन्न घेतले जाते. त्यामुळे मागणी चांगली आहे. जालना येथे ७ क्विंटल ड्रॅगन फ्रुट नुकतेच विकण्यात आले असून त्याला १५० रुपये किलो असा भाव मिळाला. मागणी जास्त आहे, परंतु ड्रॅगन फ्रुटचे उत्पन्न कमी असल्याने आता त्याचा तुटवडा पडत आहे. त्यामुळे या फळाचे उत्पादन जास्त प्रमाणात घेण्यासाठी आजही वाव असल्याचे त्यांनी सांगितले.
![]() |
शेतकरी रमेश जाधव |
२० वर्षे बागेतून उत्पन्न
ड्रॅगन फ्रुट एकदा लावलेली फळबाग सुमारे १५ ते २० वर्षे मोडण्याची गरज नाही. ही फळबाग करण्यासाठी बाकी फळाफळासारखे जास्त मेहनत करण्याची गरज नाही. त्यामुळे डॅगन फ्रूटची शेती करणे आपण पसंद केले. यासाठी सर्व घरचे सर्व जण मेहनत घेऊन काम करत आहेत. यासाठी सेनगाव तालुका कृषी विभागाचे मोलाचे मार्गदर्शन मिळत असल्याचे शेतकरी रमेश जाधव यांनी सांगितले.
mobile number milel ka shetkarya cha
उत्तर द्याहटवा